रंजना मंत्री : मुंबई ग्राहक पंचायत
बिग बी… सुपर स्टार, अमिताभ बच्चन यांनी पानमसाला या ब्रॅण्डच्या जाहिरातीतून स्वतःचा सहभाग काढून घेतला व ही तंबाखूमिश्रित पदार्थाची ‘सरोगेट’ जाहिरात असल्याचे त्यांना माहिती नव्हते, असे सांगून त्या जाहिरातीतून आतापर्यंत मिळालेले पैसे कंपनीला परत केले, अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध् झाली आहे. अतिशय लोकप्रिय कलाकाराची ही सकारात्मक कृती जाहिरात उद्योगाला ग्राहकांच्या हिताचं वळण घ्यायला लावेल का?
वस्तूचे उत्पादक-सेवा देणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनाच्या/सेवेच्या जाहिराती आकर्षक व्हाव्या यासाठी अतिशय प्रयत्नशील असतात, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकांनी ते विकत घ्यावं; परंतु ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन या जाहिरातींसाठी काही नियम, अटी, कायद्याची बंधनं असतात, हे किती ग्राहकांना माहिती असतं बरं? आपण वृत्तपत्रांतून, टीव्हीवर जाहिराती वाचतो, पाहतो. त्या नियमांचे पालन करणाऱ्या असतात का? हे जाणून घेऊ या.
जाहिरात म्हणजे काय? तर बाजारातील वस्तूच्या उत्पादनाची/सेवेची माहिती ग्राहकाला करून देणे. नियमाप्रमाणे ही माहिती खरी व शास्त्रीय आधाराला धरूनच असली पाहिजे. पण वेगवेगळ्या ब्रॅण्डचे खाद्यपदार्थ, हेल्थ ड्रिंकस, सॉफ्ट ड्रिंक्स, सौंदर्यप्रसाधने, पॅकेज्ड फूड या आणि अशा काही उत्पादनांच्या जाहिरातीतून काय सांगितलं जातं? तर, हेल्थड्रिंक्समुळे मुलांची उंची वाढते, बुद्धी सतेज होते व इतरांपेक्षा जास्त यश मिळतं. सौंदर्यप्रसाधने वापरून मुली खूपच सुंदर दिसू लागतात, कांती उजळते व इंटरव्ह्यूमध्ये लगेच निवड होते. सॉफ्ट ड्रिंकमुळे तर हीरोमध्ये स्फूर्ती येऊन तो मारुतीसारखा एकदम लांबच्या लांब उड्डाणे मारतो.
शाळेच्या टिफीनमध्ये ब्रेडला जाम, केचप भरपूर लावून दिलं की, घरच्या पोळीभाजीची गरजच उरत नाही. असे एक ना अनेक बढा-चढाके केलेले दावे आपल्याला माहिती असतात, ते सत्याला धरून नाहीत, चुकीचे संदेश देतात, तरीही त्याचा परिणाम होतच असतो.
जाहिराती बनवताना मानसशास्त्राचा वापर मात्र उत्तम रितीने केलेला असतो. एकाच कार्यक्रमात त्याच जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात. त्यामुळे त्या मनावर ठासून बराच काळ पक्या स्मरणात राहतात. तसेच जाहिरातीत सेलिब्रिटीजकडून संदेश दिला जातो. ते पाहूनही परिणाम होतोच व खरेदी करताना ग्राहकांकडून नेमक्या त्याच वस्तूची मागणी केली जाते. जाहिराती पाहून खरेदी करणे गैर नसले तरी त्यामुळे आरोग्याची, त्वचेची हानी तसेच आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच जाहिरातींमुळे सदसदविवेक हरवता कामा नये.
कायद्यानुसार काही विशिष्ट जाहिराती दाखवण्यास मनाई आहे. देशातील स्थैर्य टिकण्यासाठी देशाच्या, जातीधर्माच्या विरुद्ध जाहिराती करता येत नाहीत. तसेच व्यसनामुळे आरोग्याची हानी होऊ नये म्हणून, टोबेको प्रोहिब्युशन ॲक्ट २००३नुसार तंबाखुजन्य पदार्थ, सिगार, दारू या जाहिरातींना मनाई आहे. तरीही काही दारूच्या ब्रॅण्डच्या जाहिराती प्रसिद्ध खेळाडू, सिनेकलाकार यांना घेऊन केल्या जातात व त्या सोडा, काचेचा पेला, निव्वळ मैत्री अशा विषयी असतात. या जाहिरातींना ‘छुप्या’ किंवा ‘सरोगेट’ जाहिराती म्हणतात. अमिताभ बच्चन यांना ‘सरोगेट जाहिराती’चा उलगडा नुकताच झाला, हे आपण वर पाहिलेच.
काही वर्षांपूर्वी बालान्न म्हणून मिल्क पावडरच्या ब्रॅण्ड्सची जाहिरात केली जात होती; परंतु आईच्या दुधाला पर्याय म्हणून कोणतेही बालान्न, मिल्क पावडर याची जाहिरात केल्याने आईच्या दुधाचे महत्त्व कमी होते. सहज पर्याय मिळाल्याने तान्ही बाळे आईच्या दुधापासून वंचित राहू शकतात, जो त्यांचा हक्क आहे. म्हणून या जाहिरातींवर बंदी आली. देशात वाढते कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ‘इन्फण्ट मिल्क सब्टिट्यूटस, फिडिंग बॉटल ॲण्ड इन्फण्ट फुड रेग्युलेशन ऑफ प्रॉडक्शन, सप्लाय ॲण्ड डिस्ट्रिब्युशन’ हा कायदा १९९२मध्ये स्थापित झाला. २००३ सालच्या सुधारित कायद्यानुसार मिल्क पावडर, बेबी फूड, फिडिंग बॉटल, त्याची निपल किंवा रबराची बुचे यापैकी कशाचीही जाहिरात दृकश्राव्य पद्धतीने किंवा लाइट, साऊंड, गॅस, स्मोक याचा वापर करून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केल्यास गुन्हा ठरून शिक्षा होऊ शकते.
जाहिरातींबाबतचे नियम, कायदे ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी असतात हे लक्षात आलं असेलच. म्हणूनच भावनिक, मानसिक, आर्थिक व आरोग्याला बाधा आणणाऱ्या किंवा आपल्या संस्कृतीच्या विरोधातील, आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात तक्रार करण्याची तरतूद कायद्यात आहे. ग्राहकांनी जागरूक राहून अशा जाहिराती सुधारण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नवीन सुधारित ग्राहक संरक्षण कायद्यात (२०१९) अशा तरतुदी अधिक कडक केलेल्या आहेत. ASCI (Advertising Standards Council of India) या सेल्फ रेग्युलेटरी संस्थेकडेही तक्रार करता येते. मुंबई ग्राहक पंचायतीने कोरोना काळातील काही आक्षेपार्ह जाहिरातींना असाच धडा शिकवला आहे. वाचकहो, तुम्हालाही एखादी जाहिरात आक्षेपार्ह वाटली, तर मुंबई ग्राहक पंचायत संस्थेला ई-मेल करून जरूर कळवा.