मुंबई (प्रतिनिधी) : खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यापासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बाबतीत राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. परमबीर सिंग यांच्यावर अटकेची कारवाई न करण्याची हमी यापुढे कायम ठेवता येणार नाही, असे राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
परमबीर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिल्याचे त्यांनी म्हटले होते. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विरोधकांच्या दबावामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या मागे अद्यापही चौकशी यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. मात्र, देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर यांचेही अनेक कारनामे नंतर बाहेर आले. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.