मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महाविद्यालये बुधवारपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली. काही ठकाणी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, तर काही ठिकाणी लेझीम – ताशासह स्वागत करण्यात आले, तर ५० टक्के उपस्थिती, कोरोनाची भीती, लोकल ट्रेनच्या प्रवासाला अनुमती नसणे अशा काही गोष्टींमुळे महाविद्यालयांमध्ये म्हणावा तसा गजबजाट दिसला नाही. तसेच काही महाविद्यालये अद्याप सुरूच झालेली नसल्याचे वृत्त आहे, तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिडनहॅम महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी महाविद्यालयातील सॅनिटायझेशन आणि अन्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
‘महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी कॉलेजसाठी प्रवास करत आहेत, त्यांनी त्यांचे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवल्यावर त्यांना तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिले आहे. ही समस्या येत्या दोन-तीन दिवसांत मार्गी लागणार आहे’, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील कोरोनाची भीती काढायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुक्तपणे वावरता येण्यासाठी त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबवणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.