Tuesday, May 13, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

बांगलादेशला पीएनजीविरुद्ध विजय आवश्यक

बांगलादेशला पीएनजीविरुद्ध विजय आवश्यक

अल अमिरात (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीत ब गटातून अव्वल स्थान मिळवण्यासाठी मोठी चुरस आहे. या गटातील नंबर वन संघांवर गुरुवारी (२१ ऑक्टोबर) शिक्कामोर्तब होईल. आजच्या लढतींमध्ये बांगलादेशची गाठ पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाशी आहे. दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंड आणि ओमान आमनेसामने आहेत.


यजमान ओमानला हरवून बांगलादेशने आव्हान कायम राखले तरी गटवार साखळीतील तिसऱ्या सामन्यात त्यांना पापुआ न्यू गिनीवर मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. याच गटातील स्कॉटलंड विरुद्ध ओमान लढतीवरही बांगलादेशची पुढील वाटचाल अवलंबून आहे. बांगलादेशसह ओमान जिंकल्यास तीन संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. अशा वेळी धावगती (निर्णायक) ठरेल. मात्र, फॉर्मात असलेल्या स्कॉटलंडने ओमानवर मात केली तर शेवट गोड करूनही बांगलादेशचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात येईल.



गुरुवारच्या पहिल्या लढतीत अनुननवी पापुआ न्यू गिनीविरुद्ध तुलनेत अनुभवी बांगलादेशचे पारडे जड आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या अपयशी सलामीनंतर महमुदुल्लाच्या नेतृत्वाखालील संघाने चुका सुधारताना ओमानविरुद्ध खेळ उंचावला. मात्र, सुपर १२ फेरीचा मार्ग अद्याप सुकर नाही. बांगलादेशला त्यांच्या तिसऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. बांगलादेशची फलंदाजी अपेक्षित होत नाही. दोन सामन्यांत केवळ मोहम्मद नईमला अर्धशतकी मजल मारता आली आहे. अष्टपैलू शाकीब अल हसन आणि मुशफिकुर रहिम यांना तीसहून अधिक धावा जमवता आल्यात. फलंदाजी बहरण्यासाठी कर्णधार महमुदुल्लासह आघाडीच्या फळीतील लिटन दास, सौम्या सरकार यांना मैदानावर अधिक काळ टिकून राहावे लागेल. फलंदाजीच्या तुलनेत बांगलादेशच्या गोलंदाजांनी छाप पाडली आहे. मध्यमगती मिस्तफिझुर रहमानसह शाकीब तसेच महेदी हसनने अचूक मारा केला आहे. तरीही चौथा आणि पाचवा गोलंदाज म्हणून अरिफ होसेन, तस्कीन अहमद तसेच मोहम्मद सैफुद्दीनला स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही. पापुआ न्यू गिनीविरुद्ध बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना फॉर्म मिळवण्याची संधी आहे. या संधीचे सोने केल्यास त्यांना सुपर १२ फेरीत खेळण्याची आशा बाळगता येईल. सलग दोन पराभवांनंतर पीएनज्ीचे आव्हान संपल्यात जमा आहे. मात्र, शेवट गोड करण्याची संधी आहे. परंतु, यावेळचा प्रतिस्पर्धीही तगडा आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटपटूंचा कस लागेल.



अ गटातही वाढली स्पर्धा


अ गटात श्रीलंका, आयर्लंड आणि नामिबिया अशा तीन संघांना पुढे जाण्याची संधी आहे. तिन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. मात्र, नामिबियाने श्रीलंका आणि आयर्लंडपेक्षा एक सामना अधिक खेळला आहे.



स्कॉटिश क्रिकेटपटूंना विजयी हॅटट्रिकची संधी


ब गटातील गुरुवारच्या लढतीत स्कॉटलंड विरुद्ध ओमान लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल. सूर गवसलेल्या स्कॉटिश संघाला सातत्य राखताना सलग तिसरा विजय नोंदवण्याची संधी आहे. केवळ या स्पर्धेतील फॉर्म नव्हे तर ओमानविरुद्धच्या यापूर्वीच्या तिन्ही लढती जिंकल्याने स्कॉटलंडचे पारडे जड आहे. उंचावलेली सांघिक कामगिरी हे त्यांच्या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. काइल कोइत्झरच्या नेतृत्वाखालील स्कॉटिश संघाकडून केवळ रिची बेरिंग्टनला हाफ सेंच्युरी मारता आली असली तरी मॅथ्यू क्रॉस आणि ख्रिस ग्रीव्हजनी ४०हून अधिक धावा केल्यात. गोलंदाजीत जोश डॅव्ही आणि ब्रॅड व्हीलने छाप पाडली आहे. ओमानने पीएनजीला हरवून विजयी सुरुवात केली तरी बांगलादेशला रोखण्यात त्यांना अपयश आले. अकिब अलियास आणि जतिंदर सिंगने फलंदाजीत तसेच बिलाल खान, कर्णधार झीशान मकसूद आणि कलीमुल्लाने गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले आहे. प्रतिस्पर्धी संघ चांगलाच फॉर्मात असला तरी मागील लढतीतून चुका टाळल्यास ओमानला स्कॉटलंडला चांगली लढत देता येईल. त्यामुळे ओमानलाही विजयाची तितकीच संधी आहे. मात्र, त्यांना चांगल्या रनरेटने विजयाची
गरज आहे.



आजचे सामने


बांगलादेश वि. पीएनजी
वेळ : दु. ३.३० वा.


ओमान वि. स्कॉटलंड
वेळ : सायं. ७.३० वा.

Comments
Add Comment