Monday, September 15, 2025

आर्यन खानला जामीन नाहीच

आर्यन खानला जामीन नाहीच

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी ३ ऑक्टोबरपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला बुधवारीही दिलासा मिळू शकला नाही. विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याच्यासह आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांचे जामीन अर्जही कोर्टाने फेटाळले आहेत. त्यामुळे आर्यनला आणखी काही दिवस ‘मन्नत’ ऐवजी कोठडीतच राहावे लागणार आहे.

आर्यन खानसह तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यानी आपला निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय न्यायाधीश पाटील यांनी दिला व तिघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे तिघांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे.

दरम्यान, आर्यनसाठी आजच मुंबई हायकोर्टात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात त्याची वकिलांची टीम असून एनडीपीएस कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळण्याच्या प्रतीक्षेत वकील आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील अन्य १२ आरोपींच्या जामीन अर्जांविषयी एनसीबीने प्रतिज्ञापत्रावर उत्तर आज दाखल केले आहे. त्याला अनुसरून एनसीबीचे वकील अद्वैत सेठना यांनी म्हणणे मांडले. आजच्या तीन अर्जांवरील निर्णयाच्या आदेशाची प्रत आम्हाला मिळावी, कारण त्यावर अन्य आरोपींच्या अर्जांविषयी आमचा बराचसा युक्तिवाद अवलंबून आहे, असे अद्वैत सेठना यांनी नमूद केले.

सत्यमेव जयते...

एनसीबीने बुधवारी कोर्टात आर्यनचे असे काही चॅट सादर केले. त्यात आर्यन व एका नवोदित अभिनेत्रीमध्ये ड्रग्जबाबत चर्चा झाल्याचे पुरावे एनसीबीला मिळाले आहेत. हे पुरावे एनसीबीने न्यायालयात सादर केले आहेत. त्याच आधारावर न्यायालयाने जामीन नाकारल्याचा म्हटले जात आहे. त्यातच समीर वानखेडे यांनी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिल्याचे समजते.

आता मुंबई हायकोर्टात अर्ज

विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी लगेचच जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यनने जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला असून या अर्जावर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी उद्या आर्यनच्या वकिलांकडून विनंती केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment