मुंबई : ‘सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा’, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली आहे.
२००४मध्ये जयंत पाटील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना पनवेलमध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारकडून एका शिक्षण संस्थेला नाममात्र दरात जमीन देण्यात आली होती. अद्याप संस्थेने त्या जमिनीवर महाविद्यालय उभारले नाही. तसेच सरकारकडून मिळालेल्या १४ एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन संस्थेने तीसपट मोबदलाही घेतल्याचे सांगितले जात आहे. ही शिक्षण संस्था जयंत पाटलांशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्विट केले की, ‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारमधील मंत्र्यांची खासियत आहे. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा, असे केशव उपाध्ये यांनी ट्विट केले.