रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) माध्यमातून कामाला सुरुवात केली असून येत्या दोन वर्षात इथले चित्र बदललेले दिसेल असे प्रतिपादन भाजपा सरचिटणीस निलेश राणे यांनी केले.
येत्या दोन वर्षात हे चित्र बदलण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय जोमाने काम करत असून केरळच्या धर्तीवर किनारपट्टीवर असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्योग सुरु होऊन इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी राणे साहेब काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सुरु होताना राणे साहेब मंत्री व्हावेत ही नियतीची इच्छा होती, त्याप्रमाणेच रत्नागिरीतील विमानतळ सुरु होण्यासाठी राणे साहेबांना रत्नागिरीत घेऊन येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात केवळ रत्नागिरी तालुक्यातील कामच रखडले आहे कारण त्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. जोपर्यंत तो थांबत नाही तोपर्यंत हे काम मार्गी लागत नाही असे निलेश राणे म्हणाले. चिपळूण येथील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार काम करत असून जे तिवरे धरणग्रस्तांना इतक्या वर्षात राहायला घरे देऊ शकले नाहीत ते पूरग्रस्तांसाठी काय करणार? असा टोलाही निलेश राणे यांनी विरोधकांना लगावला.