Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

कल्याणच्या ‘ताल’ बारमध्ये पोलीस ‘बेताल’

कल्याणच्या ‘ताल’ बारमध्ये पोलीस ‘बेताल’

पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक

कल्याण (वार्ताहर) : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ‘ताल’ बारमध्ये सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

टिटवाळा येथे राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ‘ताल’ बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखर सोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर हे होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी गाणे यापुढेही सुरू ठेवावे अशी मागणी बार मॅनेजर कडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ झाली आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या ६ जणांनी बारमध्ये धिंगाणा सुरू केला.

जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता. ‘गाणे सुरू केले नाही तर आम्ही बिल भरणार नाही’, असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसनची रिव्हॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहा जणांनी बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या ६ जणांना मंगळवारी कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले हे करीत आहेत.

Comments
Add Comment