Friday, May 9, 2025

महामुंबईपालघर

वावर वांगणी ते बेहेडपाडा रस्त्याचा साईटपट्टा तुटल्याने प्रवाशांची गैरसोय

वावर वांगणी ते बेहेडपाडा रस्त्याचा साईटपट्टा तुटल्याने प्रवाशांची गैरसोय

जव्हार (वार्ताहर) : जव्हार तालुक्यात १९९२ साली बालमृत्यू घटनेने सर्व परिचित झालेले गाव वावर-वांगणी. या गावात पूर्वी आरोग्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यूसारख्या घटना घडत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन घटनेची दखल घेतली. तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी स्वातंत्र्य जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह दहा विविध विभागांची मुख्य कार्यालय देऊन या भागाचा कायापालट केला.


परंतु, आजही या भागांतील काही गावपाडे सुविधांपासून वंचित आहेत. तालुक्यातील वावर ते बेहेडपाडापर्यंतचा रस्ता पावसाळ्यात खचून मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची साईटपट्टी पूर्ण तुटली असून याबाबत अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. अनेक वेळा संबंधितांना सांगूनसुद्धा कोणीही लक्ष देत नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.


सदर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत अंतर्गत उपकेंद्र वावर सेंटर असून या ठिकाणी एखाद्या गंभीर रुग्णाला जव्हारला घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पूर्वी बेहेडपाडा ही बस सेवा सुरळीत सुरू होती. तथापि, रस्ता पूर्ण तुटल्याने सदर बससेवा बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या कसरतींना सामोरे जावे लागत आहे.


दरम्यान, सध्या कॉलेज सुरू झाले असून बससेवा बंद असल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी तिथून पायी प्रवास करावा लागत आहे. सदर रस्ता पूर्ण खचला गेल्याने मोटारसायकलवरूनही प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सदर रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्त्याला संरक्षण भिंत बांधावी, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Comments
Add Comment