Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्ररायगड

स्वातंत्र्यानंतरही किल्ले रायगडवरील धनगरवाडी अंधारात

स्वातंत्र्यानंतरही किल्ले रायगडवरील धनगरवाडी अंधारात

संजय भुवड


महाड : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात प्रकाशाची ज्योत पेटवली. त्याच किल्ले रायगडावर पिढ्यानपिढ्या वास्तव्य करून असणारी धनगरवाडी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतरही केवळ पुरातत्व खात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे अंधारात आहे.


ऊन, वारा, पावसात साप, विंचूपासून काळोखात आपला जीव मुठीत घेऊन या वाडीतील २४ कुटुंबे आपले जीवन व्यथित करत आहेत. या कुटुंबातील उद्याच्या पिढीचे शिक्षणाचीही गैरसोय या काळोखामुळे होत आहे. किल्ले रायगडावर सोयीसुविधेच्या नावाखाली उभारलेल्या अन्य वास्तूंना वीज देताना वेगळा न्याय व पिढ्यानपिढ्या वास्तव्य करून असलेल्या धनगरवाडीसाठी वेगळा न्याय लावणाऱ्या पुरातत्व खात्याने वीज पुरवठा करण्यास हिरवा कंदील दाखवून दिवाळीपूर्वी वीज आली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे महाड तालुका प्रमुख सुरेश महाडीक यांनी दिला आहे.


किल्ले रायगडावर श्री जगदीश्वर मंदीराचे दक्षिणेला धनगरवाडी असून गेली ८ पिढ्या येथील २४ कुटुंबे या ठिकाणी वास्तव्य करून गडावर येणाऱ्या शिवभक्तांची सेवा करत आहेत. हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात जाण्याआधीपासून या कुटुंबाचे गडावर वास्तव्य आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांना दूध, ताक विक्री करून त्यांच्या जेवणाची सोय करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत असतात. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेल्यानंतर मात्र पुरातत्व विभागाने त्यांचे गडावरील वास्तव्य अनधिकृत आणि बेकायदेशीर ठरविले असून, त्यांनी गड सोडून अन्यत्र राहण्यास जावे यासाठी प्रयत्न आरंभले आहेत.


गेल्या अनेक वर्षांपासून या वाडीवर वीजेचे कनेक्शन देण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. या कुटुंबांना वीज पुरवठा देण्यास महावितरण तयार आहे, मात्र पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय त्यांना वीज पुरवठा देणे शक्य नाही. त्यामुळे महावितरणचे अधिकारीसुद्धा हतबल झाले आहेत. बुधवारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश महाडीक यांनी या प्रश्नावर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता केंद्रे यांची भेट घेतली. त्यावेळेस केंद्रे यांनी हतबलता व्यक्त केली. आता ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या प्रश्नात लक्ष घालणार आहेत.


काही वर्षांपूर्वी गडावर झालेल्या वादळात या कुटुंबांच्या झोपडीवजा घरांची छपरे उडून गेली होती. त्यांची शाकारणी करण्यासही पुरातत्व विभागाने परवानगी नाकारली होती. त्यावेळेस स्व. माणिकराव जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत स्वतः या घरांची शाकारणी केली होती.


आम्हाला वीज पुरवठा मिळावा, अशी या कुटुंबांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हीच मागणी घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश महाडीक आज महावितरणचे उपकार्यकारी अभियंता केंद्रे यांना भेटले. लहू औकिरकर, वसंत औकीरकर, सखाराम औकीरकर, राजू औकीरकर, सुनील औकीरकर, महेश औकीरकर, सुनील शिंदे, संतोष शिंदे हे गडावरील रहिवासी त्यांच्यासमवेत होते. त्यांनी केंद्रे यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.


या कुटुंबांना आपण एका दिवसात मीटर बसवून वीज पुरवठा देण्यास तयार आहोत. मात्र, पुरातत्व विभाग परवानगी देत नसल्याने ते शक्य होत नसल्याची हतबलता केंद्रे यांनी व्यक्त केली. त्यानंतर सुरेश महाडीक यांनी महाडचे आमदार भरत गोगावले आणि ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला. खा. डॉ. शिंदे यांनी या संदर्भात पुरातत्व विभागाबरोबर चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. दरम्यान, दिवाळीपूर्वी या कुटुंबांना वीज मिळाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा सुरेश महाडिक यांनी दिला आहे.

Comments
Add Comment