Tuesday, December 3, 2024
Homeमहत्वाची बातमीपुन्हा जल्लोष... आजपासून कॉलेजेस सुरू

पुन्हा जल्लोष… आजपासून कॉलेजेस सुरू

तब्बल दीड वर्षांनी तरुणाई बहरणार

मुंबई (प्रतिनिधी): कोरोनाच्या सक्तीच्या लॉकडाउननंतर तब्बल दीड वर्षांनी बुधवार २० ऑक्टोबरपासून कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ती सज्ज झाली असून तशी जय्यत तयारीही केली आहे. तर प्रदीर्घ काळानंतर प्रत्यक्ष कॉलेजात येण्यासाठी आणि तिथला माहोल पुन्हा अनुभवण्यासाठी विद्यार्थीही आसुसले असून कित्येक दिवसांनी कॉलेज परिसर आणि कट्टे गजबजुन जाणार आहेत.

कॉलेज ५० टक्के क्षमतेने सुरू करायचे असल्यामुळे नेमका कसा मेळ बसवावा, याबाबतही कॉलेज प्रशासन, प्राध्यापकवर्ग आणि प्राचार्य आदी नियोजन करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही लसमात्रा झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी कॉलेजांनी लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत. कॉलेज संकुलांचे निर्जंतुकीकरण करण्याबाबतही सांगण्यात आल्याने निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आल्याचे समजते.

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले. त्यानंतर कॉलेजे प्रत्यक्ष कधी सुरू होणार, यावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने २० ऑक्टोबरपासून कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शहरातील इंजिनीअरिंग, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू होणार आहेत. कॉलेजांनी या दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे. अनेक कॉलेजांनी आपल्या कॉलेजातील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणाचा तपशील मागविला आहे.

सुमारे ९० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे समजते. बहुतांश कॉलेजांमध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रिया यापूर्वी पूर्ण झाली आहे. असे असले, तरी बुधवारच्या आधी आणखी एकदा ही प्रकिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे समजते.

‘आम्ही आमची काळजी घेऊ, सर्व उपायायोजना स्वत: करू, मात्र लवकरात लवकर कॉलेज सुरू करून प्रत्यक्ष वर्गात शिक्षण मिळावे’, अशी अपेक्षा बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. ‘कॉलेज सुरू होणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तब्बल दीड वर्षांनी आम्ही आमच्या मित्रांना भेटणार आहोत. गतवर्षी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले बहुतांश विद्यार्थी हे तब्बल एक वर्षानंतर आपल्या वर्गमित्रांना भेटणार आहेत. त्यामुळे विशेष आनंद होत आहे,’ अशी प्रतिक्रीया विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहेत.

मिश्र शिक्षणपद्धती

‘प्रत्यक्ष वर्ग’ आणि ‘ऑनलाइन वर्ग’ अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची एक लसमात्रा घेऊन झाली आहे, अशांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहील, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे वर्गाचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी काही कॉलेजांनी तयारी केल्याचेही सांगण्यात येत आहे.

लसीकरणाला प्राधान्य हवे

प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले बहुतांश विद्यार्थी हे १८ वर्षे पूर्ण झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र जे लसीकरण करून घेऊ शकलेले नाहीत, त्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे ही शासनाची तसेच कॉलेजांची प्रमुख जबाबदारी आहे. त्यासाठी शिक्षक, प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. असे झाले, तरच कॉलेज सुरू करणे अधिक सुरक्षित होऊ शकते, असे एका पालकाने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -