
रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हा बँक ही रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्या विकासासाठी कार्यरत राहावी आणि जिल्हा बँकेतील डॉ. तानाजीराव चोरगे यांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी सहकार पॅनेलच्या विरोधात उभ्या असलेल्या योग्य उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केले.
सहकार पॅनल सर्वपक्षीय आहे असे सांगत आपल्या पद्धतीने जागा वाटप करून बँक अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी सहकार पॅनेलची घोषणा केली होती. मात्र यामध्ये भारतीय जनता पक्षाला अवघ्या २ जागा देण्यात आल्या होत्या. यामध्ये डॉ चोरगे यांनी स्वतःच्या मर्जीने जागा वाटप केल्याने निलेश राणे यांनी आपला विरोध दर्शवत हे जागा वाटप मान्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी रत्नागिरीत आलेल्या निलेश राणे यांनी जिल्हा बँकेत सुरु असलेल्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले, डॉ. चोरगे यांनी सहकार पॅनल घोषित करताना स्वतःच्या मर्जीतील संचालकांना पुन्हा संधी दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांच्या साधेपणाचा फायदा घेत भाजपाला केवळ २ जागा दिल्या. स्वतःला पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी स्वतःच्याच मर्जीतील संचालकांना पुन्हा निवडणुकीत संधी दिली. यामुळे ज्यांचे सहकारात योगदान शून्य आहे असे काही संचालक वर्षानुवर्षे निवडून येत आहेत. यामुळेच ही जिल्हा बँक केवळ एका व्यक्तीची, त्याच्या कुटुंबाची आणि जवळच्या मित्रांची बँक झाली आहे. जिल्हा विकासात या बँकेचे योगदान दिसून येत नाही.
सामान्य शेतकरी कर्जासाठी जेव्हा बँकेत जातो तेव्हा त्याला हाडतूड केले जाते, जी विकास संस्था आपली नाही अशाना अपात्र ठरवले जात आहे, बँकेकडून जिल्ह्यातील सामान्य जनता, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी कोणत्याही योजना राबविल्या गेल्या नाहीत; परंतु या बँकेकडून राष्ट्रवादीच्या साखर कारखान्यांना तब्बल ३३८ कोटींचे कर्ज आत्तापर्यंत देण्यात आले आहे. यातील पैसे जिल्हा विकासासाठी वापरलेला दिसून आला नाही. जिल्हा बँक स्वतःचा एनपीए शून्य दाखवते, ते त्यांना शक्य आहे कारण अशा मोठ्या कारखान्यांना कर्ज देऊन गोरगरिबांकडे दुर्लक्ष करण्याचे काम डॉ. चोरगे करत आहेत. रत्नागिरीपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विकास करण्यासाठी हि बँक काम करते. हीच डॉ. चोरगे यांची मनमानी बंद करण्यासाठी आपण स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले असून स्वतंत्र पॅनल उभं करण्याऐवजी सहकार पॅनेलच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या योग्य उमेदवाराला आपण संपूर्ण ताकदीनिशी सहकार्य करू असे निलेश राणे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेतील कारभाराविषयी बोलताना निलेश राणे म्हणाले की बँकेच्या कर्मचारी भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे तर त्यांच्या विरोधात असलेल्या मतदाराला अपात्र ठरवण्यात येत आहे. डॉ. चोरगे यांनी मतदार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जिल्हा बँकेचे सुज्ञ मतदार अभ्यासू व सक्षम उमेदवारांना विजय करतील असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. तर डॉ चोरगे यांचा स्वभाव जिल्हाच्या विकासासाठी धोकादायक आहे, त्यांच्या या कारभारामुळे कर्मचारीही त्रस्त आहेत. सहकार पॅनेलचा पराभव झाल्यानंतर नव्या पॅनेलची मिरवणूक कर्मचारीच काढतील असेही ते म्हणाले.