Saturday, October 25, 2025
Happy Diwali

नाणी नदीवरील बंधाऱ्यात अडकले मोठे झाड

नाणी नदीवरील बंधाऱ्यात अडकले मोठे झाड

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातून वाहणारी आणि भीमाशंकर अभयारण्यात उगम पावणारी नाणी नदीवरील नांदगाव येथे असलेल्या कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यात महापुराच्या पाण्यासोबत वाहून आलेले झाड अडकले आहे. त्या झाडाच्या मोठ्या ओंडक्यामुळे सिमेंटच्या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या झाडामुळे या बंधाऱ्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नांदगाव ग्रामपंचायतने झाडांचे ओंडके बंधाऱ्याबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. हे झाड बंधाऱ्याबाहेर काढले नाही तर, यावर्षी त्या बंधाऱ्यात पावसानंतर पाणीदेखील साचून राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाणी नदी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य बांधणीपासून महत्त्वाची ठरली आहे. सह्याद्रीच्या नाणे घाटात उगम पावणाऱ्या या नाणी नदीच्या बाजूने भीमाशंकर अभयारण्यात जाण्यासाठी पूर्वी बैलगाडीचा मार्ग होता आणि कर्जत तालुक्यातील नांदगाव आणि खांडस भागातील लोकांची भीमशंकर आणि घाटमाथ्यावर जाण्यासाठी नाणे घाटमार्गे जाणारा रस्ता २००५ च्या महापुरानंतर बंद झाला आहे. त्यामुळे नाणे घाटातून वाहत कर्जत तालुक्यात येणाऱ्या नाणी नदीच्या पाण्याबरोबर भीमाशंकर अभयारण्यामधील असंख्य झाडे महापुराच्या पाण्यासोबत वाहत येत असतात.

त्यातील एक मोठे झाड यावर्षी वाहून आले आणि नांदगाव येथे नाणी नदीवर बांधले गेलेल्या कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यात अडकून पडले आहे. त्या झाडाच्या ओंडक्यांचा आकार एवढा मोठा आहार की त्या सिमेंटचा बंधारा वाहून नेऊ शकतो. अशा स्थितीत बंधाऱ्याच्या पाणी अडवण्याचा मार्गावर ते झाड अडकून राहिले आहे.

या झाडामुळे नाणी नदीवरील या बंधाऱ्यात पाणी अडवणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. दुसरीकडे, या बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या लोखंडी पट्ट्याही लावता येणार नाहीत. त्यामुळे पाणी अडवणे कठीण असून नांदगावजवळ असलेला हा बंधारा डिसेंबर महिन्यातच कोरडा पडण्याची शक्यता आहे.

आमच्याकडे स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही पावसाळा संपण्यापूर्वी बंधाऱ्यात अडकून पडलेले झाड बाहेर काढण्याचे नक्की केले आहे. पाऊस कमी झाल्यावर त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल. - राम खांडवी, सदस्य, माजी उपसरपंच, नांदगाव ग्रामपंचायत

उन्हाळ्यात या बंधाऱ्यातील पाणी जनावरे यांच्यासाठी वापरले जाते,त्याचवेळी येथील आदिवासी लोक धुणीभांडी करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करतात. त्यामुळे बंधाऱ्यात अडकून पडलेले झाड बाजूला काढलेच पाहिजे. - प्रदीप गोरे, ग्रामस्थ

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >