Wednesday, July 17, 2024
Homeदेशहुश्श... तिसरी लाटच काय, नवा व्हेरिअंटही येणार नाही

हुश्श… तिसरी लाटच काय, नवा व्हेरिअंटही येणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेबाबतची शक्यता आणि धोक्याची चर्चा होऊ लागली होती. तिसऱ्या लाटेबाबत अनेक शंका देखील उपस्थित करण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना तिसऱ्या लाटेसाठी निर्णायक महिना ठरेल, असे सांगितले गेले होते. पण आता तिसऱ्या लाटेसंदर्भातील एक दिलासादायक माहिती पुढे आली आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना प्रादुर्भावाच्या आणखी एका लाटेची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जीनोम सिक्वेंसिंग आणि इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार अद्याप व्हायरसच्या म्युटेशनचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. त्याशिवाय विषाणूचा नवा व्हेरिअंटही समोर आलेला नाही.

दरम्यान, सरकार आणि तज्ज्ञांनी फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोविड नियमांचं पूर्णपणे पालन करण्याचं आवाहन केले आहे. कारण तोवर कोरोना विरोधी लसीकरणात देशाला मोठे यश आलेले असेल आणि परिस्थितीतही खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने बदल पाहायला मिळेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील अंतराचा अभ्यास करता तिसरी लाट ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात येऊ शकते, अशी शक्यता काही वायरोलॉजिस्ट आणि डॉक्टरांनी वर्तवली होती.

तसेच कोरोना जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल अधिकारी डॉ. व्ही. रवी यांच्या मतानुसार, ‘कोरोनाचे संक्रमण डेल्टा व्हेरिअंटपर्यंत मर्यादित राहिले आहे आणि ते आता कमी होताना दिसत असल्याचे याबाबतच्या अभ्यासातून स्पष्ट होत आहे. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे आणि व्हायरसचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे व्हायरसच्या म्युटेशनचीही शक्यता आता कमी दिसत आहे’.

नव्या व्हेरियंटची शक्यता नाही

डॉ. व्ही. रवी यांच्या म्हणण्यानुसार ‘दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत मर्यादित असलेले एमयू आणि सी.१.२ यासारखे नवे व्हेरिअंट भारतात येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यातही नवा व्हेरिअंट आलाच, तर तो डेल्टा किंवा डेल्टा प्लस इतका घातक नसेल. डेल्टा प्लस हाच दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत व्हेरिअंट होता’.

दरम्यान, आरोग्य आयुक्त रणदीप डी यांनी आपल्याला अजूनही खूप सतर्क राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. जोवर १०० टक्के लसीकरण होत नाही, तोवर कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे खूप गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकमध्ये सध्या ८० टक्के जनतेला कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. राष्ट्रीय सरासरी आकडेवारीपेक्षाही हा आकडा चांगला आणि वाखणण्याजोगा आहे, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -