हायकमांडला पत्र लिहून कळवली नाराजी
मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकार परिषदा, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडणारे व विरोधकांचे हल्ले परतावून लावणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
काँग्रेसच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची फेररचना केली आहे. हे करताना अनेक पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये सचिन सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. नव्या बदलामुळे सावंत नाराज झाले आहेत.
परिणामी त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, असे पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांडला लिहिले आहे. सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा टॅगही काढला आहे.