
‘सणांच्या पार्श्वभूमीवर लवकरच टास्क फोर्सची बैठक’
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईत कोरोनाची भीती कमी झाली आहे. रविवारी मुंबईत शून्य मृत्यू नोंद झाली आहे. यामुळे तिसऱ्या लाटेची चिंता कमी आहे. मात्र असे असताना मुंबईमध्ये पुढे लाट येणार नाही असे होणार नाही. कोरोनाचे नियम सर्वांना पाळावे लागतील, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच येत्या काळात दिवाळी आणि इतर सण येत आहेत त्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात आणि मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट महापालिकेने यशस्वीपणे थोपवली आहे. मात्र असे असताना देखील लाट येणारच नाही असे नाही. येत्या दिवसात दिवाळी आणि इतर सण येत आहेत या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असेही किशोरी पेडणेकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या. दरम्यान सध्याच्या चालू परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, तर टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार जारी केलेल्या नियमांचे देखील पालन केले जाणार असल्याचे महापौर यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की, पालिका आणि राज्य सरकारला कोरोना पार्श्वभूमीवर पूर्व तयारी करण्याचेही आदेश दिले जाणार आहेत. एकीकडे तिसरी लाट येऊ नये म्हणून मुंबई तयारी करत आहे. आजमितीस मुंबईत पहिला डोस घेतलेले ९७ टक्के आणि दोन्ही डोस घेतलेले ५५ टक्के लाभार्थी आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असली तरी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.