Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्र

दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचे नाव

दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचे नाव

वर्धा (वार्ताहर) : राजकारणात सध्या सर्वत्र आरोप-प्रत्यारोप होत असताना विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मैत्रिची अनोखी कहाणी समोर आली आहे. दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नमूद केले आहे. वर्धा नगरपालिकेच्या कार्यक्रमात सोमवारी गडकरी व मेघे एकत्र होते. यावेळी दस्तुरखुद्द मेघे यांनीच ही माहिती दिली. गडकरी यांच्या कामाचे भरभरून कौतुक करताना, ‘माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून नितीन गडकरी यांचे नाव दिले आहे,’ असे मेघे यांनी यावेळी सांगितले.


वर्ध्याच्या नगरपालिकेत विकासकामाचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते. सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केले. नितीन गडकरी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे मेंबर आहेत. माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून मी त्यांचे नाव दिले आहे, असे दत्ता मेघे यांनी सांगितले.


सुमारे एक दशकापूर्वी मेघे कुटुंबात कलह उफाळून आला होता. यानंतर नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला. सुमारे ३ वर्षांपूर्वी मेघे यांच्या मृत्यूपत्रात अटलबहादूरसिंग, गिरीश गांधी आणि नितीन गडकरी यांचा उल्लेख होता. दीड वर्षापूर्वी यात सुधारणा करण्यात आली. आता फक्त नितीन गडकरी यांचे नाव आहे.


दत्ता मेघे हे काँग्रेसच्या तिकिटावर चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते काँग्रेसच्याच तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. नंतरच्या काळात राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Comments
Add Comment