Thursday, July 3, 2025

मुंबई पालिकेच्या मुदतठेवी एक लाख कोटींच्या दिशेने

मुंबई पालिकेच्या मुदतठेवी एक लाख कोटींच्या दिशेने

मुंबई (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता १ लाख कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या पालिकेतील ठेवींचा आकडा ८२,४१०.४४ कोटी रुपयांवर गेला आहे.


मुंबई महापालिकेचा यंदाचा ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये २०१७ पर्यंत ६४ हजार ४८२ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. मात्र ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या ठेवींमध्ये तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन हा आकडा आता ८२,४१०.४४ कोटी रुपयांवर गेला आहे. अशीच वाढ होत राहिली, तर काही वर्षांत महापालिका निश्चितच एक लाख कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा टप्पा गाठेल, असे दिसते.


या मुदत ठेवींमध्ये कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, उपदान निधी, विशेष निधी, कंत्राटदार, पक्षकारांची ठेव रक्कम यांचा समावेश आहे. तर नवीन पाणी प्रकल्प योजिले असून, कोस्टल रोड, मिठी नदीची स्वच्छता यांसारखी विकासकामे आदींसाठी पालिकेने काही प्रमाणात निधी राखून ठेवला आहे.



मुदत ठेवींमध्ये अशी होतेय वाढ



मुंबई महापालिकेच्या विविध बँकांत जून २०१७ पर्यंत ६४ हजार ४८२ कोटी ६४ लाख रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन त्या ६७ हजार ७४१ कोटी ९२ लाख रुपयांवर पोहोचल्या होत्या. मार्च २०१८ पर्यंत पालिकेच्या विविध बँकात ६९ हजार १३५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. तर ३० जून २०१९ पर्यंत त्यामध्ये मोठी वाढ होऊन विविध बँकातील मुदत ठेवींची रक्कम ७९ हजार ९१ कोटी ४६ लाख रुपयांवर गेली होती. पालिकेची विविध बँकांतील मुदत ठेवींची रक्कम ८२ हजार ४१० कोटी ४४ लाख रुपयांवर गेली आहे. पालिकेने गेल्या ऑगस्ट महिन्यात विविध बँकांत एक ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी किमान २ कोटी ते ५३१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींची गुंतवणूक केली आहे. एकूण ९०७१.९९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यापोटी पालिकेला पुढील दोन वर्षात ४२८.३१ कोटी रुपयांचे व्याज मिळण्याचा अंदाज आहे.

Comments
Add Comment