Friday, October 24, 2025
Happy Diwali

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून ४० टक्के महिला उमेदवार

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून ४० टक्के महिला उमेदवार

‘लडकी हूँ लड सकती हूँ’ प्रियांका गांधींची घोषणा

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या सुद्धा रणांगणात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा आज लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच ही पत्रकार परिषद देश आणि उत्तर प्रदेशच्या महिलांना समर्पित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ असा नारा यावेळी त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधी यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. 'मी एक मुलगी आहे, मी लढू शकते' हा काँग्रेसचा नारा आहे. आपल्याला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावेच लागेल. महिलांना गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले जाईल. महिलांना तिकीट जातीच्या आधारावर नाही तर पात्रतेच्या आधारावर दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू. याची सुरुवात ४० टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात ५० टक्के महिलांना तिकिटे दिली जातील. इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. काँग्रेस त्यांना निवडणूक लढवण्यास मदत करेल, असे प्रियंका म्हणाल्या.

https://twitter.com/priyankagandhi/status/1450372307696816130

यावेळी प्रियंका गांधी यांनी केंद्र आणि योगी सरकारवरही निशाणा साधला. आज सत्तेच्या नावाखाली तुम्ही जनतेला खुलेआम चिरडू शकता, तुमच्यात खूप द्वेष भरला आहे. पण, महिला हे बदलू शकतात. तुम्ही राजकारणात माझ्या खांद्याला खांदा लावून सामील व्हा. देशाला धर्माच्या राजकारणातून बाहेर पडून पुढे नेले पाहिजे. महिलांना हे काम स्वतः करावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, “मी त्या लोकांसाठी लढत आहे जे आवाज उठवू शकत नाहीत. आवाज उठवणाऱ्यांना चिरडले जात आहे. माझे राजकारण परिस्थिती बदलणे आहे. आज उत्तर प्रदेशात हत्या आणि चिरडण्याचे राजकारण होत आहे.”

Comments
Add Comment