Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडाकर्टिस कॅम्फरची फोरट्रिक

कर्टिस कॅम्फरची फोरट्रिक

टी-ट्वेन्टी वर्ल्डकप; आयर्लंडचा नेदरलँडवर ७ विकेट राखून विजय

अबुधाबी (वृत्तसंस्था) : मध्यमगती गोलंदाज कर्टिस कॅम्फरच्या (४ विकेट) अचूक माऱ्याच्या जोरावर नेदरलँड्सला ७ विकेट आणि २९ चेंडू राखून हरवत आयर्लंडने आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये पहिल्या फेरीत अ गटात विजयी सलामी दिली. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये चार चेंडूंत चार विकेट घेणारा कॅम्फर हा जगातील पहिला गोलंदाज ठरला.

सोमवारी झालेल्या एकतर्फी लढतीत प्रतिस्पर्ध्यांचे १०७ धावांचे आव्हान आयर्लंडने १५.१ षटकांत ३ विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीवीर केव्हिन ओब्रायन (९ धावा) तसेच कर्णधार अँडी बॅलबर्नी (८ धावा) लवकर माघारी परतले तरी अन्य सलामीवीर पॉल स्टर्लिंग (३० धावा) तसेच चौथ्या क्रमांकावरील गॅरेन डेलानीने (४४ धावा) खेळपट्टीवर टिकून राहताना संघाला विजय मिळवून दिला. डेलानीने २९ चेंडूंत ४४ धवा फटकावताना ५ चौकार आणि २ षटकार ठोकले तरी मध्यमगती गोलंदाज कर्टिस कॅम्फर हा आयर्लंडसाठी मॅचविनर ठरला.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील पहिलीवहिली फोरट्रिक

कर्टिस कॅम्फरच्या ४ चेंडूंतील ४ विकेटमुळे नेदरलँड्सचा डाव २० षटकांत १०६ धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून सलामीवीर मॅक्स ओडॉउडने सर्वाधिक ५१ धावांचे योगदान दिले. नेदरलँड्सच्या डावातील दहावे षटक विक्रमी ठरले. या षटकातीला पहिला चेंडू कॅम्फरने वाईड टाकला. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर धाव आली नाही. मात्र दुसऱ्या चेंडूवर सी अॅकरमॅन (११ धावा) बाद झाला. नेल रॉकने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजांची रांगच लागली. तिसऱ्या चेंडूवर रायन टेन डोएशाते पायचीत झाला. त्याला खातेही खोलता आले नाही. त्यानंतर स्कॉट एडवर्डलाही पायचीत करत कॅम्फरने पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. एडवर्डलाही मैदानात तग धरता आला नाही. हॅटट्रिकनंतर पाचव्या चेंडूवर रोलॉफ मर्वेचा त्रिफळा उडवत सलग चार विकेट घेण्याचा (फोरट्रिक)विक्रम केला. सहाव्या चेंडूवर एक धाव आली.

नेदरलँड्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन कुपर हा खाते न खोलता धावचीत होत माघारी परतला. त्यामुळे संघावरील दडपण वाढले. त्यानंतर मॅक्स ओडॉउड आणि बॅस दी लीडे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाची धावसंख्या २२ असताना बॅस दी लीडे हा अवघ्या ७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर अॅकरमॅन आणि मॅक्स ओडॉउड डाव सावरला. मात्र कॅम्फरने एकरमॅनला बाद केल्यानंतर फलंदाज बाद होण्याची रांग लागली.

…आणि अदेरची हॅटट्रिक हुकली

कॅम्परचा सहकारी अदेर याला हॅटट्रिकची संधी होती. त्याने टाकलेल्या वैयक्तिक चौथ्या आणि डावातील शेवटच्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर पीटर सीलार, लोगन वॅन बीक आणि ब्रँडन ग्लोव्हर बाद झाले. मात्र, वॅन बीक रनआउट झाला. अदेरची हॅटट्रिक झाली असती तर वेगळा विक्रम नोंदला गेला असता.

फोरट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज

टी-ट्वेन्टी प्रकारात फोरट्रिक घेणारा कर्टिस कॅम्फर हा जगातील तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी, अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान (वि. आयर्लंड, २०१९) आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगाने (वि. न्यूझीलंड, २०१९) अशी करामत साधली होती.

कॅम्परच्या सात चेंडूत चार विकेट

पहिला चेंडू वाईड
पहिला चेंडू निर्धाव
दुसरा चेंडू विकेट (अॅकरमॅन)
तिसरा चेंडू विकेट (डोएशाते)
चौथा चेंडू विकेट (एडवर्ड्स)
पाचवा चेंडू विकेट (वॅन डर मेर्वे)
सहावा चेंडू निर्धाव

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -