Monday, August 11, 2025

ठाण्यात ‘रब्बी’चे क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न

ठाण्यात ‘रब्बी’चे क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात रब्बी हंगामात दुबार पिके घेण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित हरभरा बियाणे वाटप सप्ताह दि. २४ ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. भात पड क्षेत्रात हरभरा पिकाची प्रात्यक्षिके ७४५ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत आहेत. त्यासाठी ४४७ क्विंटल बियाणांचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.


जिल्ह्यात खरीप हंगामात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली जातात. त्यात प्रामुख्याने ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाचा समावेश होतो. उर्वरित क्षेत्रावर नाचणी, वरी, कडधान्ये व बांधावर तूर घेतली जाते. जिल्ह्यात रब्बी हंगामात पाहिजे त्या प्रमाणात पिके घेतली जात नाहीत. या हंगामातही दुबार पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी सांगितले.


भेंडी निर्यातीसाठी प्रयत्न यावर्षी रब्बी उन्हाळी हंगामात कडधान्य पिकाबरोबरच भाजीपाला क्षेत्र वाढीसाठीही विस्तार करण्यात येत आहे. निर्यातक्षम भाजीपाला उत्पादनासाठी भेंडी लागवड शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत आहे. भेंडीची निर्यात करणे सोयीस्कर व्हावे यासाठी भेंडी उत्पादक शेतकऱ्यांची व्हेजनेट प्रणालीद्वारे नोंदणी केली जात आहे.


जिल्ह्यात रब्बी उन्हाळी हंगामात कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला लागवड व तृणधान्यमध्ये मका पिकाचा क्षेत्र विस्तारात समावेश करून एकूण क्षेत्र १२ हजार हेक्टरवर नियोजन केले आहे. १८ ऑक्टोबर २०२१ पासून जिल्हा कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह साजरा केला जात आहे. त्या माध्यमातून हरभरा क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे माने यांनी सांगितले. कडधान्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रात्यक्षिक घेण्यात येत असून खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीच्या कार्यक्रमाचे २९२ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आले असून ६२.५४ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे.


भात पड क्षेत्रात (भाताच्या काढणीनंतर मोकळे असलेले शेत) कडधान्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दुबार पिकाची लागवड करण्यासाठी हरभरा पिकाची प्रात्यक्षिके ७४५ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत आहेत. त्यासाठी ४४७ क्विंटल बियाणांचा पुरवठा तालुका स्तरावर करण्यात आलेला आहे. भात पड क्षेत्रावर गळीतधान्य पिकाची लागवडीसाठी जिल्ह्यात १६२ हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पिकाची प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून ९७ क्विंटल भुईमूग बियाणे वाटप करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Comments
Add Comment