Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरसंस्थानकालीन छत्र्यांचे जीर्ण बांधकाम जमीनदोस्त

संस्थानकालीन छत्र्यांचे जीर्ण बांधकाम जमीनदोस्त

महालक्ष्मी मंदिरातील पूर्वजांच्या छत्र्या इतिहासजमा

जव्हार (वार्ताहर) : जव्हार संस्थानचे राजे तिसरे विक्रमशाह यांनी महालक्ष्मी मंदिराची स्थापना केली होती. मंदिराच्या परिसरात मुकणे राजघराण्यातील पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या राजे विक्रमशाह यांनी दगडी बांधकामात उभारल्या होत्या. मात्र, कोणत्याही प्रकारची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने सोमवारी दि. १८ ऑक्टोबर पहाटे ६ च्या दरम्यान सदर संस्थानकालीन छत्र जमीनदोस्त झाले. त्यामुळे जव्हारकर नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

जव्हार येथील राजे यशवंतनगर जवळील महालक्ष्मीचे मंदिर हे जागृत स्थान असून तिथे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव आयोजित केला जातो. १८व्या शतकात जव्हारच्या राज घराण्याकडून मातेचे मंदिर बांधण्यात आले असून आजही हे मंदिर जव्हारच्या राज घराण्याच्या मालकीचे आहे. हे जागृत स्थान असल्याने हजारो भाविक येथे भक्तिभावाने येतात व मातेचे जागृकतेचे अनुभव आजही येथील नागरिकांकडून ऐकायला मिळतात.

नवसाला पावणारी एक जागृत देवता म्हणून कोकणातील ‘जव्हारची महालक्ष्मी’ हे स्थान पूर्वी विशाल माळरानावर, निर्जनस्थळी वसले होते. जशी जशी वस्ती वाढू लागली तसा तसा मंदिराचा परिसर वस्तीने वेढला गेला असला तरीही जव्हारच्या राजे यशवंत नगरमधील श्री महालक्ष्मी मंदिराला एक वेगळेच महत्त्व आहे. १९८८ सालापासून सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. ‘रौप्य महोत्सवपूर्ती’ करणाऱ्या या उत्सवाचे यंदा ३३ वे वर्षं आहे.

देखभाल-दुरुस्ती नाही

सदर महालक्ष्मी मंदिर हे जव्हारच्या मुकणे राजघराण्याच्या मालकीचे आहे. मात्र, त्याची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या छत्र्या जमीनदोस्त झाल्या आहेत. देवस्थान ट्रस्टही जुन्या मंदिरांकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जुन्या पिढीतील नागरिकांनी आठवणींना उजाळा दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -