Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यबरकतीचे वारे...

बरकतीचे वारे…

महेश देशपांडे, गुंतवणूक सल्लागार

अलीकडेच जाहीर केलेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने सलग नवव्यांदा रेपो दर कायम ठेवले. यापूर्वी मे २०२०मध्ये रेपो दर कमी करण्यात आला होता. पतधोरण कायम ठेवल्यामुळे बँकेत मुदत ठेव असेल किंवा करणार असाल तर तोटा होण्याचाच संभव आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा परिणाम मुदत ठेवीवरील व्याजदरांवर होणार आहे. म्हणजेच कर्जावरील व्याजदर कमी असेल तेव्हा ठेवीवरील व्याजदरदेखील कमी असतो. बँका मुदत ठेवीवर पाच ते सहा टक्के व्याज देतात, तर कर्जावर सात-टक्के व्याज आकारतात. व्याज हा बँकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. बँकेकडे स्वतःचे पैसे खूप कमी आहेत. कर्जाप्रमाणे, बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर कमी पातळीवर आहेत. पूर्वीची मुदत ठेव असेल, तर जास्त काळासाठी ती रिन्यू करू नका. सहा महिन्यांनंतर रेपो दर वाढू शकतो. त्यानंतर नवीन मुदत ठेवीत पैसे गुंतवण्याची संधी आहे.

अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या फ्लोटिंग रेट मुदत ठेवी देखील देतात. अशा ठेवींमध्ये, फायदा वाढवणं तसंच दर वाढवणं आणि कमी होणं या दोन्ही गोष्टी आहेत. याचा अर्थ आता व्याजदर आणखी वाढणं अपेक्षित आहे. फ्लोटिंग रेट ठेवीवर सध्या बहुतेक बँका ५.४० टक्के दराने व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत बिगरवित्तीय संस्थांमधून फ्लोटिंग रेट ठेवींवर एक ते दीड टक्का अधिक व्याज मिळू शकतं. ज्येष्ठ नागरिकांना रिझर्व्ह बँकेचे फ्लोटिंग रेट बाॅण्ड घेता येऊ शकतात. त्यावर सध्या ७.१५ टक्के दराने व्याज मिळत आहे. त्याचा कालावधी सात वर्षे आहे.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर बहुतांश बँका नजीकच्या काळात व्याजदरात वाढ करणार नाहीत. गृहकर्जामध्ये व्याजदर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजदर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बहुतेक गृहकर्जं फ्लोटिंग रेटवर दिली जातात. रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर २०१९पासून फ्लोटिंग रेट अनिवार्य केले आहेत. बँका याला त्यांच्या बाह्य बेंचमार्कशी (जसे रेपो रेटशी) जोडतात. याचा अर्थ असा की, रेपो दर कमी होतो किंवा वाढतो, त्या वेळी तुमचं व्याज कमी होत राहतं. गृहकर्ज २० वर्षांच्या नीचांकी पातळीवर असल्याने स्वस्त कर्जाचा आनंद घेता येऊ शकतो. वाहनकर्जाचा कालावधी पाच ते सात वर्षे आहे. बहुतेक कार कर्जं निश्चित दराने दिली जात असतात. म्हणजेच कर्ज घेताना जो व्याजदर निश्चित केला जातो, तोच भरावा लागतो. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांना ते स्वस्त पडेल. अनेक बँका वार्षिक ७.७५ टक्के दराने कार कर्ज देत आहेत.

आता अर्थव्यवहारातल्या दुसऱ्या विभागाकडे वळू. वैयक्तिक कार किंवा दुचाकीबद्दल नेहमी बोललं जातं पण व्यावसायिक वाहनांच्या खरेदी, विक्रीचा सूचकांक उद्योगजगतात वाहत असलेल्या वाऱ्यांची दिशा निश्चित करतो. सध्या कमर्शिअल वाहनांना अच्छे दिन आले आहेत. कोरोनाच्या प्रकोपातून देश सावरत असल्याचा परिणाम वाहन उद्योगावर व्हायला लागला आहे. कमर्शिअल व्हेईकल्सची मागणी वाढायला लागली आहे. अर्थात दुचाकींची मागणी त्या प्रमाणात वाढलेली नाही, हे दखलपात्र आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या मते, सप्टेंबर २०२१ मध्ये वाहनांची किरकोळ विक्री ५.२७ टक्क्यांनी कमी झाली. सप्टेंबरमध्ये एकूण १२ लाख ९६ हजार २५७ वाहनांची विक्री झाली. सप्टेंबर २०२० मध्ये हा आकडा १३ लाख ६८ हजार ३०७ वाहनांचा होता. म्हणजेच वार्षिक आधारावर ७२ हजार ५० वाहनांची विक्री कमी झाली.

गेल्या महिन्यात सर्वात जास्त वाढ तीनचाकी वाहन विभागात दिसून आली आणि सर्वात मोठी घट ट्रॅक्टर विभागात दिसून आली. ट्रॅक्टर विभागात एका वर्षापूर्वी ३९.१३ टक्क्यांची वाढ होती, जी या सप्टेंबरमध्ये २३.८५ टक्क्यांनी घसरली. सप्टेंबर २०२१ मध्ये तीनचाकी वाहनांची विक्री ५०.९० टक्क्यांनी वाढली. एक वर्षापूर्वी या विभागात ३७.४० टक्क्यांची घट झाली होती. गेल्या महिन्यात या विभागात ३६ हजार ६१२ युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात या विभागाची विक्री २४ हजार २६२ युनिट्स होती. व्यावसायिक वाहन विभागातल्या विक्रीतही मोठी वाढ झाली. गेल्या महिन्यात या विभागात ५८ हजार ८२० वाहनं विकली गेली. त्यात ४६.६४ टक्के वाढ झाली. या विभागातल्या जड व्यावसायिक वाहनांमध्ये १८९.२९ टक्के इतकी मोठी वार्षिक वाढ दिसून आली. गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी वाहन विभागात वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्यात या विभागात २ लाख ३३ हजार ३०८ वाहनं विकली गेली. त्यात १६.३२ टक्के वाढ झाली. सप्टेंबर २०२० मध्ये हा आकडा २ लाख ५७६ होता. या विभागात ३०.९० टक्क्यांची वाढ झाली. दुचाकी विभागात मात्र गेल्या महिन्यात ११.५४ टक्क्यांनी घट झाली. सप्टेंबर २०२१ मध्ये ९ लाख १४ हजार ६२१ दुचाकींची विक्री झाली. वर्षभरापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा आकडा १० लाख ३३ हजार ८९५ युनिट होता. म्हणजेच एक लाख १९ हजार २७४ दुचाकींची विक्री कमी झाली. अर्थजगतात व्यावसायिक वाहनांची वाढती विक्री बोलती ठरली आहे, हे मात्र नक्की.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -