Monday, May 5, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

बांगलादेशची प्रतिष्ठा पणाला

बांगलादेशची प्रतिष्ठा पणाला

अल अमिरात (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये बांगलादेशची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अपयशी सलामीनंतर आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना गटवार साखळीतील (ब गट) दुसऱ्या लढतीत ओमानविरुद्ध विजय आवश्यक आहे.

सलामीला बांगलादेशला स्कॉटलंडकडून ६ धावांनी मात खावी लागली. फलंदाजी ढेपाळल्याने १४१ धावांचे आव्हान असूनही त्यांची मजल ९ बाद १४० धावांपर्यंतच गेली. मुशफिकुर रहिमसह (३८ धावा) कर्णधार महमुदुल्ला (३८ धावा) तसेच तळातील महेदी हसनने (नाबाद १३ धावा) थोडा प्रतिकार केला तरी आघाडी फळीचे अपयश पराभवाला कारणीभूत ठरले. सलामीवीर लिटन दास तसेच सौम्या सरकारला मोठी खेळी करण्यात अपयश आले. अनुभवी शाकीब-अल हसनलाही अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. अष्टपैलू महेदी हसन वगळता बांगलादेशच्या गोलंदाजाना प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे स्कॉटलंडने दीडशेच्या घरात झेप घेतली. प्रत्येकी चार संघांचा समावेश असलेल्या गटात प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळायला मिळतील. अपयशी सुरुवातीनंतर मुख्य फेरीचे आव्हान कायम राखण्यासाठी बांगलादेशला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याची सुरुवात ओमानविरुद्ध करावी लागेल.

ओमानने पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघावर १० विकेट आणि ३८ चेंडू राखून विजय मिळवत ब गटात विजयी सलामी दिली. त्यांच्यासाठी डावखुरा फिरकीपटू झीशान मकसूदसह (४ विकेट) अकिब इलियास (नाबाद ५० धावा) आणि जतिंदर सिंग (नाबाद ७३ धावा) हे सलामीवीर मॅचविनर ठरले. तुलनेत कमकुवत असले तरी पापुआ न्यू गिनीसंघाविरुद्धच्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे बांगलादेशचा कस लागेल. मकसूदसह बिलाल खान तसेच कलीमुल्लाने प्रभावी गोलंदाजी करताना विजयात खारीचा वाटा उचलला. अकिब इलियास आणि जतिंदर सिंग धडाकेबाज फलंदाजी केली तरी सातत्य राखण्यासाठी त्यांच्यावर दडपण असेल.

सूर गवसलेल्या स्कॉटलंडला आणखी एका विजयाची संधी

ब गटातील अन्य लढतीत पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाविरुद्ध स्कॉटलंडला आणखी एका विजयाची संधी आहे. सलामीला स्कॉटलंडने तुलनेत अनुभवी बांगलादेशला हरवले. दुसरीकडे, पीएनजीला ओमानकडून मात खावी लागली. आणखी एका विजयाने स्कॉटलंड संघ मुख्य फेरीसाठी दावेदारी पेश करू शकतो. मात्र, सातत्य राखताना त्यांची कसोटी लागेल. सलग दुसऱ्या पराभवामुळे गटवार साखळीतच आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे पीएनजी संघ प्रतिस्पर्ध्यांना कशी चुरस देतो, याचीही उत्सुकता आहे.

आजचे सामने

बांगलादेश विरुद्ध ओमान वेळ : सायं. ७.३० वा.

पापुआ न्यू गिनी विरुद्ध स्कॉटलंड वेळ : दु. ३.३० वा.

Comments
Add Comment