Friday, May 9, 2025

महामुंबई

फोटोशूटमुळे वसईच्या किनाऱ्यावर कचरा व प्रदूषणात वाढ

फोटोशूटमुळे वसईच्या किनाऱ्यावर कचरा व प्रदूषणात वाढ

कीर्ती केसरकर


नालासोपारा : वसई-विरारमधील समुद्रकिनारे विविध फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहेत; परंतु यामुळे समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे व प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. वारंवार फोटोशूटसाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असूनही याठिकाणी फोटोशूट सुरूच आहेत. त्यामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा त्रास होत आहे.


वसई-विरारमधील समुद्रकिनारे निसर्गरम्य आणि शांत असल्याने याठिकाणी विविध शहरांतील नागरिक फोटोशूटसाठी येत असतात. लग्नसोहळा, चित्रपट, मॉडेल अशा फोटोशूटसाठी भुईगाव, राजोडी, कळंब, नावापूर हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. तसेच, या समुद्रकिनाऱ्यांकडे कोणाचेही फारसे लक्ष नसल्याने फोटोशूट दरम्यान अडवणुकीची भीती नसते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी फोटोशूटमुळे होणारा कचरा व प्रदूषणाचे वाढत्या प्रमाणामुळे त्यावर प्रशासनातर्फे बंदी घालण्यात आली होती. याचबरोबर कोविडच्या काळात सगळे काही बंद असल्यामुळे फोटोशूट करण्यावरसुद्धा बंदी होती.


दरम्यान, आता कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता येऊ लागल्यानंतर कोणत्याच नियमांचे पालन न करता फोटोग्राफर बिनदिक्कतपणे फोटोशूट करत आहेत. यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पुन्हा प्रदूषण आणि कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. फोटोशूट करत असताना वापरण्यात येणारे रंग, गुलाल, फटाके हे पर्यावरणाला तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. तसेच, यामुळे दमा, डोकेदुखी असे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे, फोटो काढत असताना गुलाल हवेत उडवला जातो. यामुळे हवा प्रदूषित होत आहे. समुद्रकिनाऱ्यांवर बिनदिक्कतपणे या सर्व गोष्टींचा वापर होतो. या सर्वांमुळे तयार होणारा कचरा किनाऱ्यांवरच टाकला जातो. त्यामुळे किनाऱ्यावर अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे.



पर्यटकांसह स्थानिकही त्रस्त


हे समुद्रकिनारे फिरण्यासाठीदेखील तितकेच प्रसिद्ध आहेत आणि पर्यटकांना तसेच याठिकाणी येणाऱ्या लहान मुलांना या संपूर्ण गोष्टींचा त्रास होतो. तसेच, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला राहती वस्ती, शेती तसेच खाण्या-पिण्याची दुकाने आहेत. त्यामुळे याचा त्रास या दुकानदारांसह तेथे आलेल्या ग्राहकांनाही होतो. दरम्यान, फोटोशूट करत असताना वापरण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित धुरामुळे सर्वाधिक त्रास होत असल्याने रहिवाशांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment