
नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई मनपा निवडणुकीत दोस्ती यारी प्रकट होणार असल्याचे एकंदरीत निवडणूक प्रक्रियेतून समोर आले आहे.
महानगरपालिकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने बहुस्तरीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. यामुळे नवी मुंबईत तीन प्रभागांचे एकत्रीकरण करून तीन उमेदवारांचा समूह करून मतदार राजाकडे मतांचा जोगवा मागावा लागणार आहे. हे तीनही उमेदवार एकमेकांना साथ देऊन विजयी होण्यासाठी वाटचाल करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी एक अध्यादेश काढला. त्यामध्ये राज्यात होणाऱ्या विविध नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. यामध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धती करण्यास अडचणी येत असतील, तर २ किंवा ४ प्रभाग पद्धती अवलंबण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत; परंतु नवी मुंबई मनपात १११ प्रभाग आहेत. त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रभागात तीन सदस्यीय प्रभाग रचनेत एकूण ३७ प्रभाग निर्माण होणार आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशानुसार व नियमानुसार मनपाची लोकसंख्या व प्रभाग हे तीन सदस्यीय रचनेस योग्य असल्याने नवी मुंबईत तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेतली जाणार आहे.
नवी मुंबईत असलेली महाविकास आघाडी, भाजपमध्ये काटे की टक्कर लढत होणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत एक सदस्यीय पद्धत असल्याने अनेक माजी नगरसेवकांची ताकद आपल्या एकाच प्रभागात सीमित राहिली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जे तीन प्रभाग मिळून एक प्रभाग होणार आहे. त्यातील एका पक्षातील तिन्ही उमेदवारांना एकत्रित येऊन प्रचार करावा लागेल. हेवेदावे विसरावे लागतील. पण, जुना राग उकरून काढल्यास अपयशाचे मानकरी व्हावे लागेल. त्यामुळे निवडणुकीत तरी दोस्तीगिरीला चालना मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
कुरघोडी ठरणार अपयशाला कारणीभूत....
आजही राजकीय पक्षात हेवेदावे आहेत. जर उमेदवारांनी आपला वाद निवडणुकीच्या रिंगणात काढला, तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्यास कारणीभूत ठरणार आहे. म्हणून एकाच प्रभागात लढताना मैत्रीपूर्ण वाटचाल करावी लागणार आहे.