मुंबई : देशात करोना संसर्ग वाढू लागल्याने मुंबईसारख्या शहरातून गावाकडे परतलेले परप्रांतीय मजूर पुन्हा शहराची वाट धरत आहेत. दुसरी लाट आता ओसरत असून सणासुदीच्या निमित्ताने कामेही वाढली आहेत. त्यामुळे कुर्ला, खैरानी, धारावी, मालवणी, अंबूजवाडी या परिसरामध्ये पुन्हा कामगारांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईत परत आलेल्या या कामगारांची वैद्यकीय चाचणी तसेच लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतर कामाला रुजू करून घेत असल्याचा अनुभव या कामगारांनी सांगितला आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक पातळ्यांवर या कामगारांना संघर्ष करावा लागला होता.
मुंबईत ते ज्या ठिकाणी काम करत होते, तिथे निर्बंध कमी झाल्यामुळे पुन्हा रोजगाराच्या शोधात आले आहेत, असे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी काम करणाऱ्या बिलाव खान यांनी सांगितले. बिलाव यांनी लॉकडाउनच्या काळातील असंघटित कामगारांच्या मोबदल्याच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले. ‘अनेकांना केलेल्या कामाचे पैसे पूर्ण मिळाले नाहीत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर असंख्य तक्रारी आल्या होत्या. मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत काही लाख रुपयांची भरपाई या कामगारांना करून देऊ शकलो,’ असे त्यांनी सांगितले.
मुंबई व्यतिरिक्त अन्य ठिकाणी रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न विचारला असता जमुना दास यांनी तामिळनाडू, मध्य प्रदेश येथे काम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे मिळणारा रोजगार हा मुंबईइतका नसल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. दिवाळीच्या काळामध्ये रंगकाम, घराची दुरुस्ती, फर्निचर व्यवसायामध्ये कारागीरांची गरज भासते. त्यात मोबदला चांगला मिळतो, असेही त्यांनी सांगितले. धारावीमध्ये विविध प्रकारचे लघुउद्योग सुरू आहेत. या उद्योगाचे चक्र करोना संसर्गाच्या काळामध्ये विस्कटले होते. धारावीतील संसर्ग आता दादर, माहिमच्या तुलनेत चांगल्या प्रकारे नियंत्रणात असल्यामुळे येथेही कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.