
मुंबई : 'सैराट'च्या झिंगाटने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाचवले. सैराटमधील अर्ची आणि परश्याची जोडी तर चांगलीच गाजली. नागराज मंजुळे यांचे सैराट, फँड्री, नाळ चित्रपट चांगलेच सुपरहीट झाले. आता नागराज मंजुळे यांचा नवा चित्रपट 'घर बंदूक बिरयानी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा परश्या म्हणजे आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे एकत्र काम करणार आहेत.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. लागोपाठ तीन चित्रपटांच्या यशानंतर त्यांचा 'घर बंदुक बिरयानी' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. सिनेमाच्या नावावरूनच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात घिरक्या घेत आहे. त्यामुळे परश्या-नागराज यांच्या जोडीला पुन्हा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
दसऱ्याच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी 'घर बंदुक बिरयानी' चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून अनेकांनी टीझरला चांगलीच पसंती दिली आहे. नागराज मंजुळे यांचा आटपाट प्रॉडक्शन आणि झीस्टुडिओजमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
'घर बंदुक बिरयानी' या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर, अभिनेता सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नेहमीसारखे नागराज मंजुळे हे सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. आकाशने चित्रपटाचा टीझर अधिकृत इन्स्टा अंकाऊंटवर सामायिक केला आहे. येत्या २०२२मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत अवताडे यांनी लिहिली आहे. आणि ए. व्ही. प्रफ्फुलचंद्र यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.