Saturday, October 18, 2025
Happy Diwali

विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा विचार करा

विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा विचार करा

मुंबई (प्रतिनिधी) : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फटकारले आहे.

मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले, असे मुख्यमंत्री दसरा मेळाव्यात म्हणाले. 'दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाला आहे. साहेब. राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना,' असा खोचक टोला वाघ यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले. तीच परंपरा प्रशासनाने सुरू ठेवली आहे. हे सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झाले आहे. सरकारी चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यांना संधी पुन्हा द्यावी ही आमची मागणी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

आरोग्य विभागाच्या २४ तारखेला होणाऱ्या परिक्षेचा पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. वेळापत्रकात एकाच दिवशी वेगवेगळ्या केंद्रावर वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा होणार असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावे लागले आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो, त्यांनी म्हटलं होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील हाच धागा पकडत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे.

Comments
Add Comment