Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमी...तर नवाब मलिकांवर मानहानीचा दावा करेन

…तर नवाब मलिकांवर मानहानीचा दावा करेन

यास्मिन वानखेडे यांचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे निराधार विधाने करीत आहेत. कोणतेही वक्तव्य करण्याआधी त्यांनी विचार करावा. नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन वानखेडे यांनी दिला आहे.

ड्रग्ज रॅकेटच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोेने (एनसीबी) धडक कारवाई सुरू केली आहे. अशातच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका करण्याचे सत्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरूच ठेवले आहे. फ्लेचर पटेल कोण? त्यांचा वानखेडेंशी काय संबंध, फ्लेचर पटेलसोबत फोटोतली लेडी डॉन कोण? असे अनेक सवाल मलिक यांनी उपस्थित केले आहेत. त्यांच्या या प्रश्नांना यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या पदाचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवे. पुरावे द्या आणि मग बोला, असे यास्मिन वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

कुणाला बदनाम करण्याचे काम आम्ही करत नाही. जे चांगले काम करतात, त्यांना बदनाम करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

तर, फ्लेचर पटेल यांनीही नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. मी मलिकांना विनंती करतो की, विनाकारण कोणत्याही सैनिकाचे नाव घेऊ नका. माझा नंबर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे तुमचे कार्यकर्ते आहेतच. तुम्ही मला बोलावूही शकता, तुम्ही मोठे मंत्री आहात. पण कोणत्याही सैनिकाला किंवा गणवेशधारी अधिकाऱ्याला त्यांची कामाप्रती सचोटी दाखवण्यासाठी आपल्या परवानगीची गरज नाही. तुम्ही खरेच ड्रग्जच्या विरोधात आहात तर, समोर या आणि आमच्या मोहिमेला पाठिंबा द्या. आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करा. मी तुमच्याच भागात तुम्हाला दाखवतो की, कुठे कुठे काय काय सापडते, असे त्यांनी म्हटले आहे.

सत्यमेव जयते

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांच्याकडे विचारणा केली असता, ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -