
मुंबई : ठाकरे सरकारच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी सरकारवर केला आहे. राज्यातील ऊर्जा मंत्रालयाचा निष्काळजीपणा कोळशाच्या कमतरतेला कारणीभूत आहे, तसेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कोळसा खाणींशी करार न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे ते म्हणाले.
कोळसा खरेदी न करणे आणि त्यानंतर केंद्राकडे बोट दाखवणे हे ठाकरे सरकारचे मोठे अपयश असून हा प्रकार दुर्दैवी आहे. तसेच सरकारच्या निष्क्रियतेमुळे माजरी परिसरातील नागलोन येथील डब्ल्यूसीएलचे दोन प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरातील चिंचोली कोळसा खाणी प्रलंबित असल्याचा आरोप हंसराज अहिर यांनी केला आहे.
डब्ल्यूसीएलसोबत योग्य वेळी कोळशाचा करार केला असता तर राज्यातील कोळसा संकट टाळता आले असते. महाराष्ट्र सरकार राज्यातील कोळसा उत्पादक खाणींशी करार न करता महागडा कोळसा आयात करत असल्याचा आरोप हंसराज अहिर यांनी केला आहे.