चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुढील हंगामातही संघात कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझी उत्सुक आहे.
पुढील आयपीएल लिलावात धोनीसाठी पहिले रिटेन्शन कार्ड वापरले जाईल. पुढील वर्षीच्या हंगामासाठी एक मोठा लिलाव होणार आहे आणि दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे, असे सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकाऱ्याच्या मते, फ्रँचायझी प्रथम एमएस धोनीला कायम ठेवेल आणि त्यानंतर दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जाईल. लिलावापूर्वी रिटेन्शन नक्कीच होईल, हे खरे आहे. किती खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल, याबद्दल आम्हाला माहिती नाही. तथापि, धोनी हा पहिला खेळाडू असेल जो आम्ही कायम ठेवू. या जहाजाला त्याच्या कॅप्टनची गरज आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी जे चांगले आहे ते आम्ही करू, असे त्याने म्हटले.
चेन्नईने कोलकाताला हरवून चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे २०१०, २०११, २०१८ आणि २०२१मध्ये ही चारही जेतेपदेे धोनीच्या नेतृत्वाखालील आहेत.