
मुंबई : दिवाळीनंतर कोरोनाची एक डोस घेतल्यानंतरही नागरिकांना मॉल, लोकल तसेच इतर सर्व ठिकाणी प्रवेश मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्यांचा आढावा घेऊन आरोग्य विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.
कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्यामुळे राज्यात मंदिरे, थिएटर्स उघडण्यात आली, तसेच शाळा-महाविद्यालयांचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे यापुढेही कोरोनाबाधितांची संख्या कमी असेल आणि आरोग्य सेतू अॅपमध्ये 'सेफ' असे स्टेटस आल्यास नागरिकांना सवलत मिळेल, असे टोपे म्हणाले.
हे सुद्धा वाचा - राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूदरही कमी झालेला आहे. राज्यात सध्या २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण असून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचे प्रमाण आता ९७.३८ टक्के इतके आहे. राज्यात लसीकरणही मोठ्या वेगाने होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे टोपेंनी दिवाळीनंतर एक डोस घेऊनही नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवेश मिळण्याचा निर्णय घेतला आहे.