Thursday, September 18, 2025

बांगलादेशात हिंदूंविरोधात हिंसाचार सुरूच

बांगलादेशात हिंदूंविरोधात हिंसाचार सुरूच

ढाका (वृत्तसंस्था) : बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसाचार सुरूच असून शनिवारी सकाळी काही मंदिरांत तोड-फोड झाल्याचे वृत्त होते. शिवाय, हल्लेखोरांनी दोन हिंदू तरुणांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिंसाचारात मरणाऱ्यांची संख्या सहा झाली आहे.

बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचाराची घटना दक्षिणेकडील बेगमगंज शहरात घडली. तत्पूर्वी, दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, २००हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. तेव्हा हिंदू समाजाचे लोक विजयादशमीनिमित्त रॅली काढण्याची तयारी करत होते. यावेळी, अज्ञात हल्लेखोरांनी मंदिर समितीच्या कार्यकारिणी सदस्याला मारहाण करून त्याला चाकूने भोसकले. कुराणच्या कथित अपमानाच्या अफवेनंतर बांगलादेशात हिंदूविरोधातील हिंसाचार वाढतच चालला आहे. तत्पूर्वी गेल्या बुधवारी रात्री हाजीगंज येथे एका हिंदू मंदिरावर ५०० हल्लेखोरांनी हल्ला केला होता.

Comments
Add Comment