Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरमातीवस्तू निर्मिती व्यवसायाला संजीवनी मिळण्याची आशा?

मातीवस्तू निर्मिती व्यवसायाला संजीवनी मिळण्याची आशा?

वाडा (वार्ताहर) : पूर्वीच्या काळात घरोघरी मातीच्या चुली वापरल्या जात. आधुनिक काळात घरोघरी गॅस शेगड्यांचा वापर सुरू झाल्याने मातींच्या चुलींची मागणी कमी झाली व त्यामुळे मातीच्या वस्तू बनवणाऱ्या या व्यवसायाला घराघर लागली. परंतु, आधुनिक काळातही लोकांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळू लागल्याने याच वस्तूंकडे लोक आकर्षित होताना दिसत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला पुन्हा संजीवनी मिळेल अशी आशा उत्पादकांना वाटत आहे.

शेकडो वर्षांपासून मातीचे माठ, चुली, चुलुंबे, पणत्या, सुगडे, लग्नविधीसाठीचे न्हाणे, बांडी, मडके इत्यादी वस्तू मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होता. परंतु, आधुनिक काळात या वस्तू हद्दपार होताना दिसत होत्या. मात्र, आधुनिकतेबरोबर लोखंडी, प्लास्टिक इत्यादींपासून बनवलेल्या वस्तूंमुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याचे दिसू लागताच पुन्हा मातीच्याच वस्तूंकडे माणसाचा कल वाढू लागल्याचे मातीवस्तू निर्मिती व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

मातीच्या वस्तूचे महत्त्व नागरिकांना पटत चालल्याने तसेच चुलीवरच्या जेवणाची लज्जतही लोकांना भुरळ घालत असल्याने आज चुलींनाही मागणी वाढत आहे. कुणबी तसेच आगरी समाजात लग्नसमारंभातही चुलीची आवश्यकता भासत असते. आज मातीच्या चुली २५० ते ३०० रुपये तर चुलुंबा १०० ते १५० रुपये या दराने विक्री होत असते.

वडिलोपार्जित या व्यवसायावरच आमच्या कुटुंबीयांचा उदर्निवाह होत असून हा व्यवसाय काही काळ लोप पावत चालला होता. मात्र, आता पुन्हा या व्यवसायाला संजीवनी मिळेल अशी आशा आहे. – वर्षा चिरनेरकर, माती वस्तू व्यवसायिक, कुंभार आळी, वाडा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -