Tuesday, August 26, 2025

भारताला आठव्या जेतेपदाची संधी

भारताला आठव्या जेतेपदाची संधी

माले (वृत्तसंस्था): मालदिवची राजधानी माले येथे सुरू असलेल्या ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये शनिवारी (१६ ऑक्टोबर) सात वेळचा विजेता भारताची गाठ नेपाळशी पडेल. या स्पर्धेत अजिंक्य असलेल्या कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील माजी विजेत्यांना आठव्या जेतेपदाची संधी आहे.

पाच देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारताने चारपैकी दोन सामने जिंकताना आठ गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. भारताला उर्वरित दोन सामन्यांत बरोबरी (ड्रॉ) पाहावी लागली. एकूणच त्यांना हरवण्यात प्रतिस्पर्धी चार संघांना अपयश आले आहे. शेवटच्या साखळी सामन्यात यजमान मालदिवला ३-१ अशा फरकाने हरवत भारताने सातत्य राखले आहे. अंतिम फेरीतील दुसरा संघ असलेल्या नेपाळने चार सामन्यांत दोन विजयांसह ७ गुण मिळवलेत. मात्र, एका सामन्यात ड्रॉ पत्करताना एका सामन्यात पराभव पाहावा लागला आहे.

भारताची भिस्त कर्णधार सुनील छेत्रीवर आहे. बुधवारच्या मालदिवविरुद्धच्या दोन गोलांसह त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलसंख्या ७९वर पोहोचवली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना (७७ गोल) मागे टाकले. छेत्रीसमोर आता अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी (८० गोल) आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना (११५ गोल) मागे टाकण्याचे आव्हान आहे. अंतिम फेरीत सातत्य राखताना भारताला ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेची ट्रॉफी उंचावून देण्यात छेत्रीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

या स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी भारताला शेवटच्या साखळी सामन्यात मालदीवविरुद्ध विजय अनिवार्य होता. भारताने सुरुवातीपासून मालदीवच्या बचावफळीवर दडपण टाकले. त्यांनी चेंडूवर ताबा मिळवला. ३३व्या मिनिटाला मनवीर सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी काही मिनिटेच टिकली. मध्यंतरापूर्वी अली अश्फाकने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे मालदीवने सामन्यात बरोबरी साधली. मात्र प्रेरणादायी छेत्रीने पुन्हा एकदा विजयवीरची भूमिका बजावताना नऊ मिनिटांत (६२ आणि ७१वे मिनिट) दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिला. यानंतर बचावफळीने उत्कृष्ट खेळ केल्याने भारताने हा सामना जिंकला.

भारताने मालदिवपूर्वी, नेपाळला हरवले आहे. तुलनेत कमी रँकिंग असलेल्या भारताला बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर सलग दोन विजय मिळवत दमदार कमबॅक केले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठताना फायनल प्रवेश केला. नेपाळ संघ प्रथमच ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळत आहे. मात्र, स्पर्धेतील एकूण गोल पाहता त्यांनी भारतावर ६-५ अशी आघाडी घेतली आहे. त्यांची मदार अंजन बिस्तासह सुमन लामा, आयुष घलन आणि मनीष डांगीवर आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >