Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणछत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्या रक्ताचा

छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्या रक्ताचा

महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन

निलेश राणे यांचे भावोद्गार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्यासाठी रक्ताचा आहे. आम्ही शिवप्रेमी आहोत, महाराज हेच आमचं जग आहे. देवाच्या स्थानी आम्ही महाराजांना बघतो. त्यांचे संस्कार आमच्या रक्तात आहेत. मुघलांसारखे एवढं मोठं संकट अंगावर असताना महाराज उभे ठाकले. तीच ऊर्जा आमच्यात येते त्यामुळेच सत्ता कोणाचीही असो समोर विरोधक कितीही मोठा असो त्याला अंगावर घेण्याची ताकद आमच्यात असते, असे भावोद्गार भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून पालिकेच्या शिवउद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे ही सावंतवाडीकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. या पुढील पिढ्यांना महाराजांचा इतिहास कळावा. ते कसे जगले असतील? कसे लढले असतील? यापासून प्रेरणा घेऊन पुढील पिढी आदर्श घडावी यासाठी महाराजांचा हा पुतळा सावंतवाडीकरांसाठी प्रेरणादायी ठरेल. या पुतळ्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होते हे देखील माझे भाग्यच आहे. मला मनापासून जे कार्यक्रम आवडतात त्यापैकी हा एक सोहळा असून मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, न.प. गटनेते राजू बेग, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा समिती सभापती उदय नाईक, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान उपस्थित होते.

‘संजू परब महाराजांचे संस्कार विसरले नाहीत’

संजू परब यांना मी ते नगराध्यक्ष नव्हते तेव्हापासून ओळखतोय. मात्र, नगराध्यक्ष झाल्यानंतर इतक्या कमी वेळात त्यांना प्रशासन समजलं, प्रशासनावर पकड जमवली, शहरात कोट्यवधींची कामे केली. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. कारण त्यांनी हे काम करत असताना नेहमीच राजकारण बाजूला ठेवलं. माझ्या शहराला जी गरज आहे त्यात राजकारण येता कामा नये हे त्यांनी नेहमी पाहिलं. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम करत असताना संजू परब यांनी महाराजांचे संस्कार कधीही विसरले नाहीत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -