Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाचेन्नईची आयपीएलवर मोहोर

चेन्नईची आयपीएलवर मोहोर

अंतिम फेरीत कोलकात्यावर २७ धावांनी मात

दुबई (वृत्तसंस्था) : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जनी आयपीएल २०२१ जेतेपदावर मोहोर उमटवली. त्यांनी अंतिम फेरीत शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सवर २७ धावांनी मात केली. सलामीवीर फाफ डु प्लेसिससह गोलंदाज मॅचविनर ठरले. चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद आहे.

फायनलमध्ये १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची मजल ९ बाद १६५ धावांपर्यंत गेली. शुबमन गिल (५१ धावा) आणि वेंकटेश अय्यरच्या (५१ धावा) ९१ धावांच्या तडाखेबंद सलामीनंतरही २४ धावांत विकेट ८ गमावल्याने कोलकाता अपेक्षित चुरस देऊ शकला नाही. मध्यमगती शार्दूल ठाकुरने सलग दोन चेंडूंत अय्यर आणि नितीश राणा यांना बाद केल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांचा डाव कोसळला. दोन वेळा विजेत्या कोलकाताची आयपीएलचा अंतिम सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तत्पूर्वी, चेन्नईने २० षटकांत ३ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली. फाफ डु प्लेसिस (८६) आणि ऋतुराज गायकवाडने (३२) संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. ऋतुराज बाद झाल्यानंतर डु प्लेसिसला रॉबिन उथप्पाची (३१) उत्तम साथ लाभली. त्यानंतर डु प्लेसिस आणि मोईन अलीने (नाबाद ३७) शेवटच्या पाच षटकांत फटकेबाजी करत ६१ धावा काढल्याने चेन्नईला दोनशेच्या घरात नेले. फाफ डु प्लेसिसने ५९ चेंडूंत ८६ धावांची खेळी करताना सात चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली.

ऑरेंज कॅप ऋतुराजकडे

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावताना ऑरेंज कॅप मिळवली. फॉर्मात असलेल्या महाराष्ट्राच्या बॅटरने ६३५ धावा फटकावल्या. बंगळूरुचा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने ३२ विकेट घेत पर्पल कॅप आपल्या नावे केली.

धोनीची त्रिशतकी मजल

यंदाचा फायनल सामना हा धोनीचा टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ३००वा सामना होता आणि ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच क्रिकेटपटू आहे. धोनीने चेन्नईचे २१४ सामन्यांत नेतृत्व केले असून त्याने एका आयपीएल हंगामाच्या १४ सामन्यांत रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते. तसेच त्याने भारताचा कर्णधार म्हणून ७२ सामने खेळले. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७मध्ये पहिलावहिला टी-ट्वेन्टी विश्वचषक जिंकला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -