मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतच वसुलीचे १०० कोटी तिजोरीत येत होते. फकिरी आणि झोळीची भाषा आयत्या बिळावरचे नागोबा आणि वसुलीबाज नाही करू शकत, असा पलटवार भाजपने शुक्रवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘पक पक पकाक’ अशा शीर्षकाने त्यांनी टि्वट केले आहेत. त्यांना हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार? यांना केवळ वसुली आणि वाझे माहीत आहेत. गुजरात होते म्हणून ड्रग्ज पकडले गेले. तुमच्या मंत्र्यांनी हर्बल तंबाखू म्हणून ते विकून तिजोरी भरली असती. थोडे तुम्हालाही पाठवले असते, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी. हा किती मोठा विनोद. पण ते जिंकून आले आहेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने मुख्यमंत्री थोडेच झाले आहेत, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींची चाकरी स्वीकारल्यापासून हिंदुत्वाशी फारकत घेतली, आता समाजवादी पार्टीची बिर्याणी घरी येऊ लागलेली दिसते, कारण भारत माता की जय, ऐकून पोटात मुरडा येतोय, अशी टीकाही त्यांनी केली.