Thursday, July 25, 2024
Homeदेश...तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

…तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

पणजी (वृत्तसंस्था) : ‘पाकिस्तानने आपल्या मर्यादेत राहावे. काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना पाठिंबा देणे पाकने थांबवावे. त्यात सुधारणा न केल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होईल’, असा खणखणीत इशारा सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरूवारी दिला. भारताच्या सीमेशी छेडछाड करणे इतके सोपे नाही. काही वर्षांपूर्वी पूंछमध्ये हल्ला झाला. तेव्हा पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक करून भारताने जगाला दाखवून दिले होते. पंतप्रधान मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच आपल्या सीमेची सुरक्षा आणि सन्मान सिद्ध केला’, असे ते म्हणाले. दरम्यान,यावेळी त्यांनी तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला.

संपूर्ण देश मनोहर पर्रिकर यांना दोन गोष्टींसाठी नेहमी लक्षात ठेवेल. त्यांनी गोव्याला ओळख दिली आणि दुसरे म्हणजे त्यांनी सैन्यातील तिन्ही दलांना ‘वन रँक, वन पेन्शन’ मिळवून दिले. गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात शहा बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. पूर्वी दहशतवादी हे देशाच्या सीमा ओलांडत होते. त्यांनी दहशतवाद पसरवला. त्यावेळी दिल्लीतून एका निवेदनाशिवाय काहीही होत नव्हते. पण पुंछमध्ये हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सीमेशी छेडछाड करणे इतके सोपे नाही, हे भारताने दाखवून दिले, असे त्यांनी सांगितले. मोदी-पर्रीकर यांनी नव्या युगाची सुरुवात केली. आता जशास ते उत्तर दिले जाईल. पाकिस्तानने कुरघोड्या थांबवल्या नाहीत आणि त्याची पुनरावृत्ती केली तर सर्जिकल स्ट्राइकसाठी तयार राहावे, असा इशारा शहांनी दिला.

उरी, पठाणकोट आणि गुरदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. २९ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता.

‘पाकमधून होणारी घुसखोरी थांबली नाही आणि काश्मीरमध्ये अशाच प्रकारे सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहिले; तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला जाईल’, असा कडक इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. ‘जेव्हा पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि आपले जवान मारले गेले. काश्मीरच्या सीमेवर हल्ला झाला आणि त्यात आपले जवान मारले गेले. त्यांना जिवंत जाळण्यात आले, पण नंतर सर्जिकल स्ट्राईक करत भारताने जगाला दाखवून दिले आहे, की भारताच्या सीमाभागात छेडछाडी करणे किती महागात पडू शकते, असे शहा यांनी म्हटले आहे.

मोदी, डोभाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक

जम्मू-काश्मिरात गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत काही दिवसांतच ७ नागरिकांचा बळी घेतला. त्यानंतर काश्मीरपासून ते नवी दिल्लीपर्यंत खळबळ उडाली. दरम्यान, नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. काश्मीर प्रश्नासंदर्भात सुरू असलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांच्यात ही बैठक काश्मीर आणि सीमावर्ती भागांच्या मुद्द्यावर होत आहे. त्यात डोवाल हे मोदींना यासंबंधीची माहिती देणारआहेत. अलीकडेच दहशतवादाच्या मुद्यावर गृह मंत्रालयातही एक महत्वाची बैठक झाली. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात नव्याने आघाडी उघडण्यात आली आहे.

हे शिवसेनेचे बदललेले स्वरुप : देवेंद्र फडणवीसांचा टोला

कोरोनाची दुसरी लाट कायम असताना शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. यंदाच्या वर्षी षण्मुखानंद सभागृहात होणा-या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे हे बदललेले स्वरुप असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून फडणवीस यांनी टोला लगावला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येणार आहेत. मला वाटते हे शिवसेनेचे बदलते स्वरुप आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -