Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सिंधुदुर्गातील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढले

सिंधुदुर्गातील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढले

चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने बाधितांचे प्रमाण वाढले

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सिंधुदुर्ग येथे कारोना उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी असली तरी बाधितांचे प्रमाण मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. गेल्या आठवडाभरात तर हे प्रमाण सुमारे सात टक्क्यांपर्यंत गेले असून राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यात चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सिंधुदुर्गमध्ये दहा दिवसांपूर्वी बाधितांचे प्रमाण सुमारे पाच टक्के होते. गेल्या आठवडाभरात सिंधुदुर्गमध्ये चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाधितांचे प्रमाण जवळपास सात टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या मात्र कमी झाली असून ६६९ वरून ६३६ झाली आहे.

जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. सध्या दिवसाला सुमारे ३०० चाचण्या होत असून यातून ३० ते ४० रुग्ण आढळत आहेत. याआधी प्रतिदिन सुमारे १२०० चाचण्या होत होत्या, असे सिंधुदुर्गचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले.

चाचण्या वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नागरिक चाचण्या करून घेण्यास तयार होत नाहीत. तसेच एकीकडे लसीकरण जोरदार करण्याचे आदेश आहेत, तर दुसरीकडे चाचण्या वाढविणे अशी दोन्ही कामे मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये कशी करायची, असा प्रश्न सिंधुदुर्गमधील आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांनी उपस्थित केला.

नगरमध्ये बाधितांचे प्रमाण कमी

गेले काही दिवस चिंताजनक स्थिती असलेल्या नगरमध्ये मात्र बाधितांचे प्रमाण तीन टक्क्यांच्या खाली गेले आहे. तसेच नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. परंतु नाशिक, पालघर आणि पुणे येथे बाधितांचे प्रमाण वाढतच आहे.

राज्यातील सुमारे २६ टक्के उपचाराधीन रुग्ण पुण्यात असून त्या खालोखाल सुमारे २० टक्के मुंबई, नगरमध्ये ४५ टक्के, ठाण्यात १२ टक्के आणि साताऱ्यात सुमारे पाच टक्के आहेत.

कोकण विभागात सर्वाधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. पुण्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत असून गेल्या आठवडाभरात राज्यात सर्वाधिक ३,५०१ रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यानंतर मुंबई (३,३८०), नगर (२,५५०), ठाणे (१,८७३) आणि सातारा (९३२) यांचा समावेश आहे.

चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक चाचण्यांचे प्रमाण कमी झाले की बाधितांचे प्रमाण वाढते. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानंतर येथे संसर्गाचे प्रमाण वाढणे अपेक्षित होते, परंतु इतक्या उशिरा याचा परिणाम जाणवणार नाही. सध्या रुग्णवाढ वेगाने होत नसली तरी अमरावतीमध्येही सुरुवातीला अशीच स्थिती होती. त्यामुळे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >