श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील मेंढर उप-विभागात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत भिम्बर गल्ली भागात गुरुवारी दोन जवान शहीद झाल्याचं समजतंय. यामध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि एका शिपाई रँकच्या जवानाचा समावेश आहे. रायफलधारी विक्रम सिंह नेगी (२६ वर्ष) आणि योगम्बर सिंह (२७ वर्ष) अशी या दोन जवानांची नावं आहेत. गुरुवारी झालेल्या चकमकी दरम्यान हे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. हे दोन्ही जवान मूळचे उत्तराखंडचे होते.
भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ ऑक्टोबरपासून दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत एकूण सात जवान शहीद झाले आहेत. यापूर्वी पूँछ राजौरीच्या मंडू भागात एका ज्युनिअर कमिशन्ड अधिकाऱ्यासहीत पाच जवान शहीद झाला होते. पूँछ जिल्ह्याच्या सीमावर्ती सुरनकोट भागातील ‘डेरा की गली’जवळ एका गावात दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात हे पाच सैनिक शहीद झाले होते.
नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर सेना आणि पोलिसांकडून संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली आहे पूँछ जिल्ह्यात सुरक्षा दलांवर हल्ला करणारे दहशतवादी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या भागांत उपस्थित असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दिली होती. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्याचं दिसून येत आहे. या मोहिमेदरम्यान सुरक्षादलानं आतापर्यंत १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. बुधवारी सुरक्षादलानं ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या शम सोफी याला पुलवामाच्या त्राल भागात ठार केलं.