
मुंबई (प्रतिनिधी) : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र निर्माण सेना या दोघांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यातूनच मनसेने आता पोस्टरबाजी सुरू केली आहे. मनसेकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर ‘गर्व से कहो, हम हिंदू हैं’ असे लिहिले आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटोही छापण्यात आला आहे.
सेनाभवनासमोर हे पोस्टर लावून हिंदुत्वाचा नारा बुलंद करतानाच शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न मनसेने या पोस्टरद्वारे केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने असे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी घरोबा केल्यानंतर या टीकेची धार अधिकच तीव्र झाली. शिवसेनेच्या या भूमिकेवरून नाराज असलेल्या शिवसैनिकांना आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत.
हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्वाचे विचार हे मनसेप्रमुख राज ठाकरे पुढे घेऊन जाऊ शकतात आणि ज्या लोकांमध्ये धमक आहे, तेच लोक म्हणू शकतात ‘गर्व से कहो हम हिंदू है’. दसऱ्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी हा बॅनर लावला आहे आणि फक्त दादरमध्येच नाही तर प्रभादेवी, वरळी या ठिकाणीदेखील लावले आहेत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.