Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तिसरा डोळा बंदच!

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तिसरा डोळा बंदच!

नवी मुंबई : महानगरपालिका हद्दीत कोट्यवधी रुपये खर्च करून नऊ वर्षांपूर्वी तिसरा डोळा असणारे सीसीटीव्ही कॅमेरे विविध भागात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यान्वित करण्यात आले. परंतु त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वाताहत झाली आहे. बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नवी मुंबईकर वाऱ्यावर असलेले दिसून येत आहे.

दरम्यान एखाद्या वाईट किंवा चांगली घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या घटकांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. यामुळे नवी मुंबईकर नाराजीचा सूर आळवत आहेत.

सायबर सिटी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगपलिका क्षेत्रात २०१२/१३मध्ये दिघा ते बेलापूर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी साधारणतः २०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. परंतु आजच्या घडीला मनपा विद्युत विभागाचे असणारे दुर्लक्ष तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा देखभाल व दुरुस्तीअभावी सीसीटीव्ही यंत्रणेची वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी एखादा सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. त्याठिकाणी एखादी घटना घडली असेल त्यासंबंधी चित्रफीत पाहण्यास गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नागरिकांना आल्या पावली वापस घरचा रस्ता पकडावा लागत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण करण्यामागचा उद्देश हा गुन्हेगारी वृत्तीवर प्रतिबंध आणणे हे आहे. तसेच एखादा दुर्दैवी गुन्हा, घटना घडल्यानंतर त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास जास्त फायदा होत असतो; परंतु मनपा प्रशासन व ठेकेदारांच्या बेफिकिरीमुळे मूळ उद्देशच लोप पावला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये मनपाकडून सुरू करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी सुमारे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त कॅमेरे बंद असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु आता जे आमदार निधीमधून नव्याने काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले आहेत. ते मात्र सुस्थितीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

योजना राबविल्या जातात पण….

मनपाची स्थापना झाल्यापासून आजतागायत अनेक योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण योजना राबविल्यानंतर दुर्लक्ष झाल्याने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. यामध्ये उद्यान, तलाव व्हिजन यासहित इतर ठिकाणे कोमेजली आहेत. पुढील काळात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काळजी घेतली नाही, तर कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माझ्या घराच्या खिडकीची काच अज्ञात व्यक्तींनी १ ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास फोडली. काच कोणी फोडली हे सीसीटीव्ही फुटेजवर पाहण्यासाठी मी घणसोली विभाग कार्यालयाशी संपर्क साधला. पण, आजूबाजूला असणारे तीनही कॅमेरे बंद असल्याचे सांगितले गेले. – दर्शना देशमुख, गृहिणी, घणसोली

जे जे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते तत्काळ शोधून दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. – सुनील लाड, कार्यकारी अभियंता, विद्युत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -