
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. परंतु कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही मुंबईकरांना १४ दिवसांनी लोकलचा केवळ मासिक पास मिळत होता. मात्र, आता मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी १८ वर्षाखालील तसेच दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलचे तिकीट दिले जाणार आहे. प्रवाशांना तिकीट खिडकीवरूनच तिकीट खरेदी करावे लागेल. जेटीबीएस, एटीव्हीएम कुपन्स आणि यूटीएस अॅपवर तिकीट उपलब्ध होणार नाही.
शाळा, महाविद्यालये सुरू होणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रेल्वेचे तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू झाल्यामुळे दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे लसीकरणाला पात्र नसलेल्या १८ वर्षाखालील मुलांना रेल्वे तिकीट मिळणार असून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रकृती अस्वास्थामुळे ज्यांना कोरोना लस घेण्याची परवानगी नाही त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवून तिकिट घेता येणार आहे.