मुंबई : मुंबईतील कुर्लायेथील ८४ विहिरी नष्ट झाल्याचे कीटक नियंत्रण विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीत उघड झाले आहे. या विहिरींमध्ये खासगी मालकीच्या ४३ विहिरी, सरकारी मालकीच्या ३८ विहिरी, आणि पालिकेच्या ३ विहिरींचा समावेश आहे. परंतु विहिरी हरवल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसून सरकारी दफ्तरीतही विहिरींची नोंद नसल्याचे समोर आले आहे.
शहरीकरणानंतर मुंबईत पाण्याची गरज म्हणून विहिरींची संख्या वाढू लागली. परंतु त्यानंतर मुंबईकरांना योग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नवनवीत यंत्रणा उभारल्या. त्यामुळे मुंबईतील विहिरी बुजवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २००९मध्ये विहिर संवर्धनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तसेच २०१७मधील निवडणुकीच्या वचननाम्यात विहिरी संवर्धनाबाबत दिलेल्या आश्वासनाचा सत्ताधारी पक्षाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.