Tuesday, November 5, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआपण विकासाचा विचार करू...!

आपण विकासाचा विचार करू…!

माझे कोकण : संतोष वायंगणकर

कोकणातील सिंधुदुर्गात चिपी येथे विमानतळाचा शुभारंभ झाला. मुंबई-सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. मला वाटतं विकासाचं एक पुढचं पाऊल पडलं आहे. कोकणवासीयांनी या सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. राजकारणी आणि राजकारण हे त्याच्या-त्याच्या जागी राहणार. त्याचा विचार आपण करण्यापेक्षा कोकणच्या विकासाला गती कशी मिळेल. विकासाचा विचार करत असताना कोकणातील पर्यटन व्यवसाय कसा वाढेल. पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील, याचा विचार करून त्यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत. राजकीय नेते, पुढारी यांनी काय करावं, हा त्यांचा प्रश्न झाला. मात्र, आपण काय करावं हे तरी आपणच ठरवायला हवं ना! संधी निर्माण होणारे उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपण सजग असायला हवे. आजवर झालंय, असं म्हणत आपण निश्चिंत असतो. आपणाला काय करायचंय हे काहीच ठरलेलं नसतं. साहजिकच आपलं नियोजन, उद्दिष्ट आणि उद्देश निश्चित नसल्याने कुठे जायचंय, काय करायचंय यासंबंधी आपण कधीच विचार करीत नाही.

गावात, शहरात, वाडीत एकाने रिक्षा घेतली म्हणून दुसराही रिक्षाच घेणार! एकाने चहाचा स्टॉल सुरू केला की, दुसराही चहाचा स्टॉल सुरू करणार. अशा प्रकारे स्टॅण्डवर रिक्षा किंवा चहाचे स्टॉल वाढत जातात. यामुळे धड कोणाचेच पोट भरत नाही. ‘सारेच उपाशी’ अशी स्थिती निर्माण होते. कोकणात ज्युस सेंटर, उसाचा रस विक्री करणारे रसवंतीगृह चालविणारे, भेळपुरी विकणारे असे या सर्व व्यवसायात परप्रांतीय उभे दिसतात. ना जागा, भाडं! रस्त्याच्या बाजूला उभे राहिलेले रसविक्री करणारे, ज्युस सेंटर चालविणारे कोण कुठून येऊन व्यवसाय करतात आणि आपण मात्र, ‘भैया, दो ज्युस देना’ अशी ऐटीत ऑर्डर करण्यात समाधान मानतो. कोकणच्या विकासाच्या वाटचालीचा विचार करताना सहज म्हणून प्रत्येक शहरातील बाजारपेठांकडे एक नजर टाकली, तर समजून येऊ शकेल! शहरात किराणा, कापड, हार्डवेअर या व्यवसायात कोकणातील तरुण आहे कुठे? बाजारपेठेत कोकणातील तरुणांची दुकानं शोधावी लागतील. एवढ्या बाजारपेठांवर परप्रांतीयांचा कब्जा आहे. वडिलोपार्जित व्यवसाय काय करायचा, म्हणून मग काहींनी आपली दुकाने भाड्याने दिलीत.

मिळणाऱ्या भाड्यात मौज-मजा करायची, हे वास्तव चित्र कोकणातील आहे. कापड व्यवसायात कोकणातील काही व्यावसायिक टिकून राहण्याचा प्रयत्न करतात; परंतु ऑनलाइन ऑर्डर आणि बाजारातील परप्रांतीयांची कापड दुकाने यात आपल्याकडचा व्यावसायिक टिकून राहू शकत नाही. तीच स्थिती हार्डवेअरच्या व्यवसायातील आहे. हार्डवेअरची बाजारपेठ तर पूर्णपणे गुजराती समाजाकडे आहे.

कोकणातील सर्व मोक्याच्या जागा आणि व्यवसाय हे परप्रांतीयांच्याच हातात आहेत. रस्त्यावरच्या व्यवसायापासून बाजारपेठेतील व्यवसायांपर्यंत सर्वत्र परप्रांतीय दिसतात. आपण याचा कधीच गांभीर्याने विचार करीत नाही. जे व्यावसायिक आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते ठरावीक चौकटीपलीकडे जाऊन व्यवसाय करण्याच्या मानसिकतेत नाहीत. ज्यांच्या मनामध्ये व्यवसाय, उद्योग क्षेत्राच्या अवकाशात भरारी मारण्याची इच्छा-आकांक्षा आहे; परंतु त्यांच्या पंखात बळ नाही अशी स्थिती आहे. समृद्ध कोकण केवळ बोलून निर्माण होणार नाही. त्यासाठी सर्वांनाच काम करावं लागेल. कोकणात रेल्वे धावू लागली, तेव्हा कोकण रेल्वेच्या वेगाबरोबरच विकासाचा वेग वाढेल हेच अपेक्षित होते; परंतु मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबईचा प्रवास सुखकर झाला, एवढाच आपण विचार केला; परंतु त्यापलीकडे जाऊन येणाऱ्या कोकण रेल्वेबरोबर विकासाची एक नवीन संधी, नवा मार्ग कोकणात येतोय, याचा विचारच करण्यात आलेला नाही. यामुळे तिथेही तेच घडले. त्या कोकण रेल्वेसोबत अनेक व्यावसायिक कोकणात आले आणि गेल्या पंधरा वर्षांत पूर्णपणे स्थिरावले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. सिंधुदुर्गातील बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु अन्यत्र मात्र अद्यापही बरंच काम अपूर्ण आहे; परंतु याच चौपदरीकरण झालेल्या, होत असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा मात्र जास्तीत-जास्त जागा या परप्रांतीयांनी घेतल्या आहेत. सध्या अनेक ठिकाणी व्यवसाय थाटलेले दिसतात. आपल्याकडच्या भूमीपुत्रांना स्वत:च्या महामार्गालगतच्या जागा विकताना भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही. आजही केला जात नाही. परप्रांतीय कोकणात आले यात त्यांचा दोष नाहीच. ते कष्ट करून, मेहनत करून स्वत: स्थिरस्थावर होण्यासाठीचे अपार कष्ट घेतले जातात. ती मानसिकता परप्रांतीयांमध्ये आहे. दुकान बंद करता-करता जर ग्राहक आले, तर परप्रांतीय कधीच ग्राहक सोडणार नाहीत. तर, काहीही करून, वेळ झाला तरीही, ग्राहकाचे समाधान करतील; परंतु तेच कोकणातील व्यावसायिक आता दुकान बंद करतोय, आता काही मिळणार नाही. म्हणून सांगून मोकळे होतील.

आजही आपणाकडे व्यावसायिक मानसिकता आलेली नाही. ती आली पाहिजे. विकासाच्या नवनवीन योजना, प्रकल्प येतच राहतील. त्या येणाऱ्या योजना, प्रकल्पांकडे आपण संधी म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. तरच येणाऱ्या संधीचं सोनं करता येईल. अन्यत: आणखी कितीही आणि कोणतेही प्रकल्प आले तरीही कोकणात फक्त ‘गावगजाली’ होत राहतील. त्यापलीकडे जाऊन काही घडणार नाही. या प्रकल्पांचा लाभ घेणारे लाभार्थी वेगळेच असतील, तर तो दोष आपलाच असेल. आपणच आपला भविष्याचा विचार करून वाटचाल करायला हवी. शासन काय करायचं ते करेल; परंतु जे आपण करायला हवे ते आपल्यालाच करावं लागेल.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -