मोनिश गायकवाड
भिवंडी : भिवंडी शहराच्या स्व.राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरवस्था झाली असताना त्याच्या दुरुस्तीसाठी मागील कित्येक दिवसांपासून हा उड्डाणपूल अवजड वाहतुकीस बंद होता. आता उड्डाणपूल दुरुस्ती कामास प्रारंभ झाला असून, रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.
नुकतीच या उड्डाणपुलाच्या कामास पालिकेने मंजुरी दिल्यानंतर महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त सुधाकर देशमुख, शहर अभियंता एल. पी. गायकवाड, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मायने उपस्थित होते.
दरम्यान वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ११ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी असा तब्बल ११३ दिवस उड्डाणपूल बंद राहणार असल्याची अधिसूचना काढली होती, तर पालिका प्रशासनाने दोन महिने उड्डाणपूल दुरुस्ती कामी बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते. उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला असून त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.
कल्याण नाका ते धामणकर नाका या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक अतिक्रमण व अनेक बंद व मोठी वाहने उभी असल्याने याकडे पालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. थातूरमातूर कारवाई होत असल्याने या कारवाईचा काहीही प्रभाव अतिक्रमण करणाऱ्यांवर होत नाही. या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
उड्डाणपूल चार महिन्यांसाठी बंद
उड्डाणपुलाची दुरुस्ती होत असताना संपूर्ण उड्डाणपूल चार महिन्यांसाठी वाहतुकीकरिता बंद राहणार असल्याने शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आहे. शहरातील अवजड वाहतूक पूर्ण बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून त्या मार्गांचा अवलंब वाहन चालकांनी करावा असे आवाहन वाहतूक विभागा तर्फे राजेंद्र मायने यांनी केले आहे.