Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रक्रीडा

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वरच्या खेळाडूंचे यश

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वरच्या खेळाडूंचे यश

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य प्रदेश उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ खेळाडूंनी पंधरा पदके महाराष्ट्राला जिंकून दिली.


कोरोनानंतरच्या या पहिल्याच स्पर्धेत  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण १३ खेळाडूंची निवड झाली. त्यातील आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि ते आठवड्याभरातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी उज्जैनला रवाना झाले. या आठ खेळाडूंनी वैयक्तिक सात पदके आणि सांघिक आठ पदके अशी एकूण १५ पदकांची लयलूट केली. तनश्री जाधव हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुरलेल्या मल्लखांबात सुवर्णपदक, दोरी मल्लखांबात रौप्यपदक  आणि वैयक्तिक विजेतेपदामध्ये देखील रौप्यपदक पटकावले तसेच सांघिक सुवर्णपदक अशी एकूण चार पदके पटकावली.


रिषभ घुबडे याने १८ वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात कांस्यपदक तसेच दोरी मल्लखांबात कांस्यपदक तर सांघिक रौप्यपदक अशी एकूण तीन पदके पटकावली. सोहम शिवगण याने १४ वर्षांखालील गटात वैयक्तिक विजेतेपदात कांस्यपदक तसेच सांघिक कांस्य पदक पटकावले. आदी वायंगणकर याने १४ वर्षांखालील गटात पुरलेल्या मल्लखांबात वैयक्तिक कांस्यपदक आणि सांघिक विजेतेपदामध्ये देखील कांस्य पदक पटकावले. तसेच अक्षय तरळ याने खुल्या गटात सांघिक सुवर्णपदक पटकावले. १२ वर्षांखालील गटात सानवी देसाई आणि शिवांगी पै यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक  जिंकले.


या सर्व निकालाच्या मागे श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे मार्गदर्शक महेश अटाळे तसेच गणेश देवरुखकर, इशा देवरुखकर आणि अविनाश मोरे अशी प्रशिक्षकांची टीम होती.

Comments
Add Comment