शिवाजी कराळे, विधिज्ञ
जगातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. संशोधन, जागतिक हवामानबदल आणि साहित्यासाठी दिलेले नोबेल पुरस्कार त्या व्यक्तींच्या कामकाजावर जागतिक ठसा उमटवणारे आहेत. त्याचबरोबर काही नावं पुरस्काराचा सन्मान वाढवणारी आहेत.
गेल्या १२० वर्षांपासून नोबेल पुरस्कार दिले जातात. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ ‘नोबेल पुरस्कार’ दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमधल्या उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत दहा भारतीयांनाही नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. बहुतांश पुरस्कारार्थींनी आपल्या पुरस्काराची रक्कम संशोधन, शांतता, सामाजिक उपक्रमासाठी वापरली. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा वापर समाजहितासाठी किती होतो, याचाही पुरस्कार निवडीत विचार केला जात असतो. भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या तीन मूलभूत शास्त्रांसोबतच गणितासाठीही पुरस्कार दिला जातो. जगात शांतता स्थापनेसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्यांनाही सन्मानित केलं जातं.
जागतिक हवामानबदल हा सध्या परवलीचा विषय बनला आहे. जगावर होणारे त्याचे परिणाम आणि त्यावरच्या उपाययोजनांचा विचार करून केलेल्या संशोधकांचाही सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबरपासून हे पुरस्कार जाहीर होतात. रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सेसने या वर्षाचं भौतिकशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर केलं. स्युकुरो मनाबे, क्लाऊस हॅसलमन आणि जियोर्जियो पारिसी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या तिघांना हा पुरस्कार त्यांच्या जटिल भौतिकशास्त्र प्रणालींच्या संशोधनकार्यासाठी देण्यात आला आहे. आतापर्यंत भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी २१६ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, ज्यात चार महिलांचा समावेश आहे. २०२०मध्ये रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेन्झेल आणि अँड्रिया गेझ यांना भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आलं.
२०२१चा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापौटियन यांना मिळाला आहे. या दोघांनीही तापमान आणि स्पर्श संवेदना जाणवण्यासाठी कामी येणाऱ्या रिसेप्टर्सवर संशोधन केलं आहे. मागील वर्षी औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार हार्वे अल्टर, मायकल होउगटन आणि चार्ल्स राइस यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला होता. रक्तातून निर्माण होणाऱ्या हिपटायटिस आजाराविरोधातल्या लढाईत या शास्त्रज्ञांचं योगदान महत्त्वाचं आहे. हिपटायटिसच्या आजारामुळे लोकांना मोठ्या संख्येने सायरोसिस आणि यकृताचा कर्करोग होतो. या तिन्ही शास्त्रज्ञांनी ‘हिपाटायटिस सी’ची ओळख पटवता येईल अशा एका नोवल विषाणूचा शोध लावला होता.
यंदाचं रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक बेंजमिन लिस्ट आणि डेविड डब्ल्यूसी मॅकमिलन यांना जाहीर झालं आहे. सेंद्रिय उत्प्रेरकांच्या शोधकर्त्यांना यंदाचा नोबेल पुरस्कार दिला आहे. गेल्या वर्षी जिनोम एडिटिंगच्या पद्धतीचा शोध लावल्याबद्दल इमॅन्युएल चार्पेंटिअर आणि जेनिफर ए. डॉडना हा पुरस्कार देण्यात आला होता. ऑर्गेनोकॅटिलिसिस क्षेत्रात आश्चर्यकारक गतीने विकास होत आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनामुळे रासायनिक अभिक्रियांचा वेग पर्यावरणपूरक पद्धतीने, कमी खर्चात वाढवणं शक्य झालं. या पुरस्कारामध्ये सुवर्णपदकासह ११ लाख डॉलर्सपेक्षा जास्त रोख रकमेचा समावेश आहे. टांझानियन कादंबरीकार अब्दुलराजाक गुर्नाह यांना २०२१ मधलं साहित्याचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. १९८६ नंतर गुर्नाह हे पहिले आफ्रिकन कृष्णवर्णीय आहेत, ज्यांना साहित्यासाठी नोबल पारितोषिक देण्यात आले आहे. १९४८ मध्ये झांझीबारमध्ये जन्मलेले गुर्नाह १९६०च्या उत्तरार्धात शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये आले. निवृत्त होईपर्यंत ते केंट, कँटरबरी विद्यापीठात इंग्रजी आणि उत्तर औपनिवेशिक साहित्याचे प्राध्यापक होते. ते पॅराडाइस आणि डेझर्टेशन या प्रसिद्ध कांदबऱ्यांसह एकूण १० कादंबऱ्यांचे लेखक आहेत. गेल्या वर्षीचा पुरस्कार अमेरिकन कवी लुईस ग्लुक यांनी जिंकला होता.
पंचेंद्रियांद्वारे माणसाला आसपासच्या परिस्थितीचे ज्ञान होतं. माणसाच्या याच क्षमतेमुळे विविध प्रकारच्या प्रतिकूल स्थितीत टिकून राहण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आपल्या शरीराच्या त्वचेवर असणाऱ्या संवेदकांच्या साह्याने उष्ण, थंड तापमान तसंच विविध प्रकारच्या स्पर्शांबाबतची माहिती मज्जासंस्थेद्वारे मेंदूपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याला अनुसरून आपल्याला वेदना जाणवतात. स्पर्शाबाबतची ही मूलभूत माहिती विज्ञानाला विसाव्या शतकापासूनच होती; मात्र जनुकीय पातळीवर ही प्रक्रिया नेमकी कशी घडते याबाबतचं विश्लेषण यंदाच्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी केलं आहे. डॉ. डेव्हिड ज्युलियस यांनी संवेदनांशी संबंधित मानवी डीएनएमधल्या लाखो जनुकांचा अभ्यास केला. या अभ्यासातून मिरचीमधल्या कॅप्सायसिन या उष्णता निर्माण करणाऱ्या रसायनाची जाणीव करून देणारं नेमकं जनुक शोधून काढलं. पुढील अभ्यासातून या जनुकाशी संबंधित विशिष्ट प्रथिनं शोधण्यात डॉ. ज्युलियस यांना यश आलं. हे प्रथिन म्हणजे मानवी पेशींमधल्या उष्णतेची जाणीव करून देणारा रिसेप्टर (टीआरपीव्ही १) असल्याचं त्यांनी सिद्ध केलं. ज्युलियस आणि पॅटापौटियान यांनी स्वतंत्रपणे मेंथॉल रसायनाचा वापर करून शीत तापमानाची जाणीव करून देणारा ‘टीआरपीएम ८’ हा रिसेप्टरही शोधला. विविध प्रकारचे पृष्ठभाग आणि वस्तूंना स्पर्श केल्यावर आपल्याला ती वस्तू कशी आहे हे स्पर्शाने समजतं. मानवी त्वचेमध्ये असणारी ही क्षमता मानवी पेशींमधल्या ‘पियेझो-१’ आणि ‘पियेझो-२’ या रिसेप्टरमुळे असल्याचं पॅटापौटियान यांनी दाखवून दिलं. पॅटापौटियान आणि त्यांच्या सहकार्यांनी सर्वप्रथम धक्का लागल्यानंतर विद्युत संदेश निर्माण करणाऱ्या पेशींना विलग केलं. त्यानंतर यांत्रिक बलाची जाणीव करून देणाऱ्या जनुकांचा शोध घेतला. त्यांच्या या शोधातून पेशींच्या कवचाला धक्का लागल्यावर सक्रिय होणाऱ्या आणि आपल्याला स्पर्शाची जाणीव करून देणाऱ्या ‘आयन चॅनल’चं अस्तित्व सिद्ध झालं. ज्युलियस आणि पॅटापौटियान यांच्या संशोधनामुळे स्पर्श आणि संवेदनांची मूलभूत प्रक्रिया नेमकेपणाने उलगडली आहे. विविध आजारांमधल्या तीव्र वेदनांचं शमन करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.
या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार पत्रकार मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव्ह यांना जाहीर झाला. अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख नोबेल समितीनं पुरस्कार जाहीर करताना केला. फिलिपिन्स येथील मारिया रेसा यांनी २०१२ मध्ये रॅपलर नामक एक माध्यमसमूह स्थापन केला. त्या या समूहाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आपल्या पत्रकारितेदरम्यान त्यांनी निर्भयपणे काम करून समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम केलं. त्यामुळे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांचा विचार करण्यात आला, असं समितीने म्हटलं आहे. दिमित्री मुरातोव्ह यांनी गेल्या अनेक दशकांपासून रशियामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवाज उठवण्याचं काम केलं आहे. यासाठी त्यांना अनेक वेळा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. १९९३ मध्ये मुरातोव्ह यांनी ‘नोव्हाजा गॅझेटा’ नामक एक स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केलं. सरकारविरुद्ध कडवी टीका करण्याचं काम या वृत्तपत्राकडून केलं जातं. रशियात इतर माध्यमांकडून दुर्लक्षित करण्यात येणारे विषय मांडणं, तथ्यांवर आधारित पत्रकारिता करून समस्या लोकांच्या निदर्शनास आणणं यांसाठी हे वृत्तपत्र ओळखलं जातं.